विटा नगरपालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:42 AM2021-02-23T04:42:49+5:302021-02-23T04:42:49+5:30
विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्चपासून छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक, सर्वसामान्यांचे लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद झाले. उत्पन्न नसल्याने हाल सुरू ...
विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्चपासून छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक, सर्वसामान्यांचे लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद झाले. उत्पन्न नसल्याने हाल सुरू आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी. पाणीपट्टी दरवाढही मागे घ्यावी, अशी मागणी विटा शहर शिवसेनेच्यावतीने मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्याकडे करण्यात आली.
कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. विटा नगरपरिषद हद्दीतील मिळकतधारकांची यावर्षीची घरपट्टी, पाणीपट्टी कराची रक्कम आणि नव्याने करण्यात आलेली पाणीपट्टी दरवाढ रद्द करून दिलासा देणे गरजेचे आहे. सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव करावा. घरपट्टी व पाणीपट्टीची जाचक वसुली करू नये. फेब्रुवारी अखेरपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेनेच्यावतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला.
यावेळी शहरप्रमुख सुधीर ऊर्फ राजू जाधव, नगरसेवक अमर शितोळे, संजय भिंगारदेवे, विजय सपकाळ, समीर कदम, अॅड. मिलिंद कदम, रणजीत पाटील उपस्थित होते.