विनामास्क फिरणाऱ्यांवर विटा पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:44+5:302021-05-26T04:27:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या कडक निर्बंधाचे उल्लंघन करून विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवर विटा पोलिसांनी करडी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या कडक निर्बंधाचे उल्लंघन करून विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवर विटा पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांकडून पोलिसांनी सुमारे पाच लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नियम मोडून ग्राहकांना दुकानातील साहित्य देणाऱ्या ६१ दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी येत नाही. विटा शहरासह तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगसह लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरात अत्यावश्यक सेवावगळता किराणा दुकानासह सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत तरीही काही दुकानदार दुकानाच्या पाठीमागील दरवाजातून लोकांना किराणा माल विक्री करत आहेत. या पार्श्वभूमीवर विटा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात नाकाबंदी करण्यात आली असून ग्रामीण भागातही पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. शासनाने कडक निर्बंध लागू केल्यानंतर पोलिसांनीही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. विटा शहरासह खानापूर तालुक्यात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत ६१ दुकानदारांवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवरही पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांकडून जवळपास ५ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. अत्यावश्यक कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडण्याच्या सूचना असतानाही काहीजण विनामास्क व बिनकामाचे रस्त्यावरून फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी अशा मोकाट फिरणाऱ्या लोकांच्या दुचाकी जप्त करण्याबरोबरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. विटा पोलिसांच्या या कारवाईमुळे मोकाट फिरणाऱ्यांची संख्या आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.