विटा : सांगलीतील गर्भपातप्रकरणी विटा येथे माऊली हॉस्पिटलवर छापा : पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:06 PM2018-09-28T12:06:12+5:302018-09-28T12:09:53+5:30
सांगली येथील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपातप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा विटा येथील डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या माऊली हॉस्पिटलवर छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची कागदपत्रे हाती घेण्याचे काम सुरू होते
विटा : सांगली येथील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपातप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा विटा येथील डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या माऊली हॉस्पिटलवर छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची कागदपत्रे हाती घेण्याचे काम सुरू होते. विटा शहरात गेल्या चार दिवसांपूर्वी महाडिक हॉस्पिटलवर छापा टाकून डॉ. अविजित महाडिक यांना अटक केली होती. त्यानंतर आता या गर्भपात प्रकरणी डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या रूग्णालयावर छापा टाकल्याने विट्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सांगली येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी चौगुले दाम्पत्याला अटक केली आहे. त्या चौकशीनंतर या प्रकरणाचे कनेक्शन विटा येथे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे विटा येथील डॉ. अविजित महाडिक यांचे नाव समोर आले. त्यांना रविवारी पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी अटक केली होती. त्यांना दि. २८ पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी रात्री उशिरा उपअधीक्षक अशोक विरकर यांच्यासह पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाने डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या विटा येथील माऊली रूग्णालयावर छापा टाकला.
सांगलीच्या चौगुले दाम्पत्याने केलेले गर्भपात गर्भलिंग निदानानंतर केले असतील तर हे प्रकरण केवळ बेकायदेशीरपुरते मर्यादित राहणार नाही, हे उघड आहे. पोलिसांनी विटा येथे माऊली हॉस्पिटलमध्ये गुरूवारी रात्री हाती लागलेल्या पुराव्याबाबत नेमका खुलासा केलेला नाही. परंतु हे प्रकरण गर्भलिंग निदानाच्यासंदर्भात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, माऊली हॉस्पिटलचे डॉ. मेटकरी हे तिरूपती बालाजीच्या दरबारात असल्याने त्यांना तातडीने विट्यात बोलावून घ्या, असे उपअधीक्षक वीरकर यांनी नातेवाईकांना सांगितले.