विटा जिल्हा परिषदेत क्रीडा पुरस्कार अनुदान वाटपावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:57 PM2018-11-30T23:57:52+5:302018-11-30T23:59:50+5:30

शासकीय स्पर्धेतील विजेत्यालाच क्रीडा पुरस्कार अनुदान देण्याचे शिक्षण समितीमध्ये ठरले असताना, खासगी स्पर्धकाला अनुदान दिल्याचा विषय शुक्रवारी येथे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच तापला.

Vita Zilla Parishad's Sports Award | विटा जिल्हा परिषदेत क्रीडा पुरस्कार अनुदान वाटपावरून गदारोळ

विटा जिल्हा परिषदेत क्रीडा पुरस्कार अनुदान वाटपावरून गदारोळ

googlenewsNext
ठळक मुद्देसभापतींच्या ‘चुटकी’मुळे सभागृहात तणावतम्मणगौडा रवी-पाटील ‘लक्ष्य’

विटा : शासकीय स्पर्धेतील विजेत्यालाच क्रीडा पुरस्कार अनुदान देण्याचे शिक्षण समितीमध्ये ठरले असताना, खासगी स्पर्धकाला अनुदान दिल्याचा विषय शुक्रवारी येथे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच तापला. यावरून सत्ताधारींसह विरोधी गटाचेही सदस्य आक्रमक झाले.
आठ दिवसांपूर्वी मुख्यालयात क्रीडा अनुदान वाटपाबाबत सदस्यांनी चर्चा करण्याची तयारी दाखविल्यानंतर शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनी हाताच्या बोटाने ‘चुटकी’ वाजवून चर्चा टाळल्याचा मुद्दा भाजपच्याच सुरेंद्र वाळवेकर यांनी सभागृहात मांडताच तणाव निर्माण झाला. सभापती रवी-पाटील यांनी अवमान केल्याने त्यांच्या या कृतीचा सदस्यांनी तीव्र निषेध केला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधाण सभा येथील सभागृहात अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, सभापती सुषमा नायकवडी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे उपस्थित होते.
सुरेंद्र वाळवेकर यांनी अनधिकृत समांतर शिक्षण समिती रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला. ही समिती स्थापन करून आमच्यावर अविश्वास दाखविल्याचे ते म्हणाले.
शाळा तपासण्यासाठी जाताना शिक्षण सभापतीच दांडी मारतात. ते सदस्यांसमवेत येत नसल्याचा मुद्दा सदस्य जितेंद्र पाटील यांनी उपस्थित केला. त्यावेळी सभापती रवी-पाटील यांना क्रीडा पुरस्कार अनुदान वाटप आणि शाळा तपासणी मोहिमेबाबत सदस्यांनी ‘लक्ष्य’ केले. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी हाताने ‘चुटकी’ वाजवून अनुदान वाटप झाल्याचे सांगत सदस्यांना आव्हान दिल्याचे वाळवेकर यांनी सांगताच, सदस्यांनी निषेध केला.
कुंडलापूर व मालगाव येथे बल्ब व इलेक्ट्रीक साहित्यातील भ्रष्टाचाराची फर्स्ट ग्रीन एनर्जी संस्थेविरोधात न्यायालयात तक्रार असताना, ती संस्था जिल्हा परिषदेच्या निविदा प्रक्रियेत कशी सहभाग घेत आहे, असा सवाल सौ. सुनीता पवार यांनी उपस्थित करीत, या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. त्यावर या संस्थेच्या निविदा न स्वीकारण्याबाबत ग्रामपंचायतींना नोटिसा काढण्यात येतील, असे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.
जितेंद्र पाटील, शरद लाड, सत्यजित देशमुख, प्रमोद शेंडगे यांसह अन्य सदस्यांनी कृतियुक्त अध्ययन व अध्यापन प्रणालीस कडाडून विरोध केला.

दुष्काळाबाबत स्वतंत्र बैठक : देशमुख
जिल्हा परिषदेच्या सभेत दुष्काळावर चर्चा होणे गरजेचे असले तरी, यावर चर्चा करून तातडीने मार्ग काढण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी व उपाययोजना करावी, अशी मागणी डी. के. पाटील यांनी केली. याबाबत लवकरच सांगली येथे स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे आश्वासन अध्यक्ष देशमुख यांनी दिले.

Web Title: Vita Zilla Parishad's Sports Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.