शिराळा येथे सोमवारपासूून विवेकानंद व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:19+5:302021-01-09T04:21:19+5:30
शिराळा : शिराळा येथे विवेकानंद व्याख्यानमाला सोमवार (दि. ११)पासून सुरू होणार आहे. व्याख्यानमालेचे हे २४ वे वर्ष आहे. कोरोनाच्या ...
शिराळा : शिराळा येथे विवेकानंद व्याख्यानमाला सोमवार (दि. ११)पासून सुरू होणार आहे. व्याख्यानमालेचे हे २४ वे वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून प्रबोधन ही परंपरा जोपासली जाणार आहे, अशी माहिती विवेकानंद सांस्कृतिक क्रीडा व सेवा मंडळातर्फे देण्यात आली आहे.
१९९८ मध्ये विवेकानंद सांस्कृतिक क्रीडा व सेवा मंडळ शिराळा या मंडळाची स्थापना केली. आमदार मानसिंगराव नाईक, सुमंत महाजन, साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन, संतोष देशपांडे, बी. टी. निकम, संतोष जोशी, आदी युवा कार्यकर्ते यांनी हे मंडळ स्थापून विवेकानंद व्याख्यानमालेचा आरंभ केला. सोमवारी (दि. ११) प्रथम पुप्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे गुंफणार असून, ते ‘उच्च शिक्षणातील नव्या दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवारी( दि. १२) वाळवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे द्वितीय पुप्ष गुंफणार आहेत. ते ‘आजची तरुणाई व पोलिसांची भूमिका’ यावर विवेचन करणार आहेत. बुधवारी (दि. १३) प्रसिद्ध लेखक विजय जाधव यांचे कथाकथन होणार आहे. याच वेळी निमंत्रित तीन कवींचे संमेलन होणार आहे. याचे नियोजन कवी व लेखक प्रा. प्रदीप पाटील यांनी केले असून, अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन भूषविणार आहेत.
रोज संध्याकाळी ५.३० वाजता ही व्याख्यानमाला श्री दत्त मंदिर सभागृहात होणार आहे. युवक, विद्यार्थी आणि श्रोते यांनी व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक, कार्याध्यक्ष सुमंत महाजन, कार्यवाह प्रा. वैजनाथ महाजन, सचिव संतोष देशपांडे, उपाध्यक्ष सर्वश्री प्रा. प्रदीप पाटील, बी. टी. निकम आणि मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे..