कोविड रुग्णालयावर स्वयंसेवकांचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 04:43 PM2020-08-12T16:43:08+5:302020-08-12T16:46:38+5:30
महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता व रुग्णांची फरफट रोखण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाऊल उचलले आहे. या कोविड रुग्णालयासाठी प्रत्येकी दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांचा मोठा गट असलेल्या संघटनांनी महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे.
सांगली : महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता व रुग्णांची फरफट रोखण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाऊल उचलले आहे. या कोविड रुग्णालयासाठी प्रत्येकी दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांचा मोठा गट असलेल्या संघटनांनी महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जिल्हा व महापालिका प्रशासनाने काही खासगी रुग्णालयेही अधिग्रहित केली आहेत. तरीही कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर आता आयुक्त कापडणीस यांनीच उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या महापालिकेची सर्वच यंत्रणा कोरोनाविरूद्धच्या लढाईत रस्त्यावर उतरली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्यात आता रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता व रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.