प्रगल्भ लोकशाही घडविण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा : वैजनाथ महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:56 PM2019-10-14T23:56:37+5:302019-10-14T23:58:10+5:30
जाहिरात क्षेत्रातील ‘आसमा’ व ‘फेम’ या संघटनांतर्फे दरवर्षी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करण्यात येतो. सोमवारी हा कार्यक्रम सांगलीतील पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘शंभर टक्के मतदान करा व लोकशाही बळकट करा’ या विषयावर महाजन यांचे व्याख्यान झाले.
सांगली : लोकशाहीत मताधिकार हा सर्वात मोठा अधिकार आहे. मत चुकीचे असो वा बरोबर; पण मतच नसणे हे मात्र धोकादायक असते. चांगले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी जास्तीत जास्त मतदान झाल्यास दबाव राहतो आणि लोकशाही प्रगल्भ बनते. त्यामुळे मताचा अधिकार शंभर टक्के वापरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन यांनी केले.
जाहिरात क्षेत्रातील ‘आसमा’ व ‘फेम’ या संघटनांतर्फे दरवर्षी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करण्यात येतो. सोमवारी हा कार्यक्रम सांगलीतील पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘शंभर टक्के मतदान करा व लोकशाही बळकट करा’ या विषयावर महाजन यांचे व्याख्यान झाले. राज्य मराठी पत्रकार संघटनेचे संघटक संजय भोकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, मतासाठी जो व्यक्ती अपेक्षा करतो, तो खरा देशद्रोही असतो, असे मत व्यक्त केले होते. आज मतासाठी विविध प्रकारची प्रलोभने देणे ही परंपरा होऊ पाहते आहे. लोकशाही टिकवण्यासाठी सर्व माध्यमांनी अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावेळी संजय भोकरे म्हणाले, माध्यमांमध्ये जाहिरात व्यवसायाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनेकदा आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. पण असे दुर्लक्ष न करता, आरोग्याची काळजी घ्या. जाहिरात क्षेत्रात मुद्रित माध्यमांमध्ये काही अडचणी येत आहेत. भविष्याचा वेध घेऊन विविध इतर माध्यमांचा वापर करून जाहिरात व्यवसाय अधिक वाढविणे शक्य आहे.
कार्यक्रमानिमित्त संघटनेतर्फे विविध दैनिके, रेडिओ, वृत्तवाहिन्यांचे संपादक, प्रतिनिधी आणि जाहिरात व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आसमा कोल्हापूरचे अध्यक्ष राजू परूळेकर, उपाध्यक्ष विवेक मंद्रुपकर, खजिनदार सुनील बासराणी, फेमचे उपाध्यक्ष कौस्तुभ नाबर, सुधीर शिरोडकर, शरद पाटील, प्रशांत बुचडे, सुनील बणगे, सुहास कोगनोळीकर, श्री. पानसकर, तसेच दोन्ही संघटनांचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.
महेश कराडकर यांनी स्वागत केले, उमेश देसाई यांनी आभार मानले. सांगली आसमाचे सुधीर अनंतपूरकर, सुनील बेलेकर, प्रकाश हुलवान, धनंजय गाडगीळ, प्रशांत कुलकर्णी, प्रमोद गोसावी, मारुती गायकवाड, राजेश शहा यांनी संयोजन केले.