जत पालिकेसाठी १३ डिसेंबरला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:12 AM2017-11-08T00:12:38+5:302017-11-08T00:14:00+5:30

Voter for Jat Municipal Corporation on 13th December | जत पालिकेसाठी १३ डिसेंबरला मतदान

जत पालिकेसाठी १३ डिसेंबरला मतदान

Next


जत : जत नगरपालिकेसाठी येत्या १३ डिसेंबरला मतदान होणार असून, १४ डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने मंगळवारी सायंकाळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्याचवेळी आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय नेतेमंडळी सतर्क झाली आहेत.
जत शहराची लोकसंख्या ४५ हजार असून मतदारसंख्या सुमारे ३० हजार आहे. दहा प्रभाग असून एका प्रभागात सरासरी तीन हजार मतदार आहेत. सदस्य संख्या वीस आहे. एका प्रभागातून दोन नगरसेवक व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडले जातील. नगरपालिकेची मुदत २२ डिसेंबररोजी संपणार आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर २ डिसेंबर २०१२ रोजी मतदान होऊन ३ डिसेंबर २०१२ रोजी मतमेजणी झाली होती. त्यानंतर पहिले मंडळ अस्तित्वात आले होते. आता होत असलेली ही दुसरी निवडणूक आहे.
जत ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर नवीन मंडळ अस्तित्वात आले. परंतु कारभार मात्र ग्रामपंचायतीसारखाच सुरू होता. मागील वर्षभरात तत्कालीन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नगरसेवक, नागरिक आणि कर्मचाºयांना शहरात नगरपालिका आहे, याची जाणीव कामाच्या माध्यमातून करून दिली होती.
डिसेंबर २०१२ मध्ये वसंतदादा विकास आघाडी व राष्टÑवादी आणि कॉँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. सुरुवातीस कॉँग्रेसला बाजूला करून विकास आघाडी व राष्टÑवादीने सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीमधील नगरसेवकांत फूट पडली. विकास आघाडी व कॉँग्रेस आणि राष्टÑवादीमधील तीनपैकी दोन नगरसेवक एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यात आली. मागील महिन्यात वसंतदादा विकास आघाडी राष्टÑवादीत विलीन करण्यात आली. परंतु या आघाडीतील सर्वच नगरसेवकांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे नेते जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत समर्थकांची सध्या नगरपालिकेत सत्ता आहे. वीसपैकी एकोणीस नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. डॉ. पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम व युवक कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांचा जत शहरात कार्यक्रम घेऊन, त्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आगामी निवडणुकीतील उमेदवार, प्रचार यंत्रणा, प्रचारातील मुद्दे, आजपर्यंत केलेले काम व यापुढे करणार असलेले काम यावर त्यांचे यश अवलंबून राहणार आहे.
आ. विलासराव जगताप यांनी शासनात सहभागी असलेल्या घटकपक्षांना सोबत घेऊन एक समिती स्थापन केली आहे. निवडून येणारा कार्यक्षम कार्यकर्ता असेल तर त्याला उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडून आण्ण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
आ. जयंत पाटील यांनी बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांना राष्ट्रवादीत घेऊन जत शहरातील पक्ष भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी शिंदे यांच्यावर सोपविली आहे.
सत्ताधाºयांना जतचे नागरिक कंटाळले : विलासराव जगताप
जत : जत शहरातील जनता नगरपालिकेतील सत्ताधाºयांना कंटाळली आहे. जनतेला बदल हवा आहे. आगामी निवडणुकीच्या माध्यमातून चांगल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन निश्चित स्वरुपात बदल घडवून आणू, अशी माहिती आ. विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. शासनातील सहकारी घटकपक्षांना बरोबर घेऊन आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. युती करण्यासंदर्भात आम्ही इतर कोणत्याही पक्षाकडे प्रस्ताव दिलेला नाही. आमचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे आम्हाला इतर पक्षांकडे जाण्याची गरज नाही, असे सांगून आ. जगताप पुढे म्हणाले, कार्यक्षम व स्वच्छ चारित्र्य असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाईल.

Web Title: Voter for Jat Municipal Corporation on 13th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.