मतदानादिवशी नेत्यांचे ठाण

By Admin | Published: February 21, 2017 11:43 PM2017-02-21T23:43:43+5:302017-02-21T23:43:43+5:30

जिल्हा परिषद, पं. स. निवडणूक : बालेकिल्ले राखण्यासाठी धडपड

Voting day | मतदानादिवशी नेत्यांचे ठाण

मतदानादिवशी नेत्यांचे ठाण

googlenewsNext



सांगली : जिल्हा परिषदेच्या १८ लढती लक्षवेधी असल्यामुळे तेथील निवडणूक काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी बागणी (ता. वाळवा), तर शिगाव (ता. वाळवा) येथे माजी मंत्री जयंत पाटील यांनी दुपारनंतर ठिय्या मारला होता. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम पलूस, कडेगाव तालुक्यात लक्ष ठेवले होते. तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, कडेगाव, पलूस, खानापूर तालुक्यातील नेत्यांनीही दिवसभर तळ ठोकला होता.
वाळवा तालुक्यात बागणी जिल्हा परिषद गटाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. मंगळवारी मतदानादिवशी साखराळे (ता. वाळवा) येथे मतदान केल्यानंतर दुपारनंतर जयंत पाटील शिगावमध्ये तळ ठोकून होते, तर सदाभाऊ खोत आणि विलासराव शिंदे यांनी बागणीत ठिय्या मारला होता.
शिराळा तालुक्यातील वाकुर्डे आणि मांगले हे दोन मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिष्ठेचे केले आहेत. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी मांगले, वाकुर्डे मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले होते. सत्यजित देशमुख यांनी स्वत:ची उमेदवारी असलेल्या कोकरूड मतदारसंघावर फोकस ठेवला होता.
खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत थांबणे पसंद केले. तेथे दौरा करून मतदानाचा अंदाज घेतला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
जत तालुक्यात भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज जगताप तिकोंडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवित आहेत. यामुळे येथील गणावर जगताप यांचे विशेष लक्ष होते.
भाजपचे राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख, गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी तालुक्यात दौरे केले. पलूस, कडेगाव तालुक्यात डॉ. पतंगराव कदम, मोहनराव कदम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी मतदान केंद्रांचा धावता दौरा केला.
मिरज तालुक्यात माजी मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील आणि विशाल पाटील यांनी लक्ष केंद्रित केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Voting day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.