सांगलीसह सात बाजार समित्यांचे बिगुल वाजले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 04:51 PM2022-11-15T16:51:11+5:302022-11-15T16:51:34+5:30
बाजार समितीमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जातात.
सांगली : इस्लामपूर, सांगलीसह जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध झाली. हरकती दाखल करण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. सुनावणी होऊन ७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत गटातील जुन्याच सदस्यांना मतदानाचा हक्क मिळाला आहे.
सांगली, इस्लामपूर, तासगाव, पलूस, शिराळा, विटा आणि आटपाडी या सात बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाते. बाजार समितीमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जातात. जानेवारीमध्ये बाजार समितीची निवडणूक होत असून सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप यादीमध्ये ग्रामपंचायत आणि सोसायटी गटातील मतदारसंख्या वाढली आहे.
बाजार समितीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी दि. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत मुदत दिली आहे. हरकती व आक्षेपांवर दि. २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर सुनावणी घेऊन निर्णय दिला जाईल. दि. ७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. अंतिम मतदार यादीनंतर निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम पंधरा दिवसांत जाहीर केला आहे. बाजार समितीसाठी २९ जानेवारीला मतदान व ३० जानेवारीस मतमोजणी होणार असल्याचे यापूर्वीच सहकार प्राधिकरणकडून जाहीर करण्यात आले आहे.
४५२ गावांमधील जुनेच सदस्य मतदार
जिल्ह्यात ४५२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. पण, या सदस्यांना बाजार समितीसाठी मतदानाचा अधिकार मिळणार नाही. जुन्याच सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. यामुळे माजी सदस्यांचा भाव चांगलाच वाढणार आहे, अशीही बाजार समिती चर्चा रंगली होती.
बाजार समितीचे असे आहेत मतदार
बाजार समिती | सोसायटी | ग्रामपंचात | व्यापारी | हमाल | एकूण मतदार |
सांगली | २८१४ | २५२६ | १५२८ | १७६४ | ८६३२ |
आटपाडी | ८५० | ५०८ | ५०९ | ९० | १९५७ |
विटा | १४६६ | १११९ | ५२५ | ४९ | ३१५९ |
तासगाव | ९९५ | ७०९ | १९२ | ५७ | १९५३ |
पलुस | ६७४ | ३८५ | ७८ | २१ | ११५८ |
इस्लामपूर | १७४४ | १०६२ | १६०४ | ३२९ | ४७३९ |
शिराळा | १०७६ | ८०३ | ७२४ | २८३ | २८८६ |