राष्ट्रभक्तीच्या वारकऱ्यांचे वडगाव!

By Admin | Published: December 4, 2014 11:23 PM2014-12-04T23:23:56+5:302014-12-04T23:41:52+5:30

चारजण शहीद : तब्बल ७0 जवान देशाच्या सेवेत, गावाच्या देशप्रेमाची कीर्ती सर्वदूर

Wadgaon of patriot warkars! | राष्ट्रभक्तीच्या वारकऱ्यांचे वडगाव!

राष्ट्रभक्तीच्या वारकऱ्यांचे वडगाव!

googlenewsNext

अमित काळे - तासगाव ... तासगाव तालुक्यातील पूर्व भागातले एक छोटेसे खेडे... सध्या येथील तब्बल ७० जवान देशाच्या सीमा मजबूत ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून सीमेवर सेवा बजावताहेत. एवढेच नाही, तर या गावातले चार जवान शहीद झाले. अत्यंत निधड्या छातीच्या, राष्ट्रप्रेमाने भारलेल्या या गावाला देशसेवेची परंपराच लाभल्याने शूरवीरांची भूमी म्हणून या गावाचा लौकिक आता देशभर होत आहे.
एकाच गावातल्या चार जवानांना देशाची सेवा करताना आलेलं वीरमरण ही अत्यंत वेदना देणारी घटना असली तरी, हे बलिदान व्यर्थ तर जाणार नाहीच, पण आज वडगावच्या मातीची कीर्ती सर्वदूर गेली. राष्ट्रप्रेम हा या मातीतला गुणच. गावात या शहीद जवानांची स्मारके उभी आहेत, हे या गावाचे वैशिष्ट्य.
गावाचे क्षेत्र किती, महसूल किती, पिके कोणती, उत्पन्न किती... ही ठरलेली मानकं. पण वडगावच्या वीर भूमीनं त्यात भर टाकत स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकाच कुटुंबातले तीन सख्खे भाऊ सैन्य दलात भरती होतात, त्यातले दोन भाऊ शहीद होतात, हे कल्पनेच्या पलीकडलेच आहे. तुकाराम विठोबा पाटील व नारायण विठोबा पाटील या दोघांचा सियाचीनच्या अतिउंच भागात बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दरीत कोसळून १९९३ मध्ये मृत्यू झाला. त्यातल्या तुकाराम पाटील यांचे पार्थिव तर २१ वर्षांनंतर मिळाले. पण तत्पूर्वी सहा वर्षे अशाच पद्धतीने त्यांचा भाऊ नारायण यांचाही असाच सियाचीनमध्येच १९८७ मध्ये मृत्यू झाला.
१९९९ मधील कारगिल युद्धात शत्रूशी दोन हात करताना महादेव पाटील यांना वीरमरण आले. त्यांचेही वय २३-२४ एवढेच होते. छातीचा कोट करून शत्रूशी झुंजत असताना ते शहीद झाले आणि आता उमाजी पवार हे नक्षलवाद्यांशी सामना करताना शहीद झाले. देशासाठी लढताना दिलेले हे बलिदान पुढच्या पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरणार आहे.
तासगाव तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या फौजा या भूमीने दिल्या, हा इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर देशरक्षणाच्या महत्त्वपूर्ण कार्यात सहभागी झालेल्या तालुक्यातील अनेक गावांतील जवानांच्या धाडसाने, साहसी वृत्तीने हे वेगळेपण जपले आहे. त्यात वडगावचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.

Web Title: Wadgaon of patriot warkars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.