‘वाडीभागाई’स केंद्रस्तरीय पुरस्काराचे वेध!
By Admin | Published: February 13, 2016 12:15 AM2016-02-13T00:15:40+5:302016-02-13T00:26:30+5:30
पंचायत सशक्तीकरण अभियान : १६ फेब्रुवारीस पथकाकडून पाहणी; ग्रामस्थांकडून तयारी पूर्ण
सहदेव खोत-- पुनवत --पंचायत सशक्तीकरण अभियान व राष्ट्रीय गौरव ग्रामसभा या दोन्ही अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या वाडीभागाई (ता. शिराळा) ग्रामपंचायतीस आता केंद्रस्तरीय पुरस्काराचे वेध लागले असून, सरपंच रामचंद्र पाटील, ग्रामसेवक बी. एस्. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी या पुरस्कारासाठी कंबर कसली आहे. येत्या १६ फेब्रुवारीस केंद्रस्तरीय पथकाकडून गावाची पाहणी होणार आहे. शिराळा तालुक्यातील वाडीभागाई हे मूठभर लोकसंख्येचे सागाव पट्ट्यातील गाव. मात्र अलीकडच्या काळात गावाने वेगवेगळ्या क्षेत्रात वाढता लौकिक मिळविला आहे. सरपंच रामचंद्र पाटील व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी गावातील युवकांना एकत्रित करुन गावाचा चेहराच बदलला आहे. ग्रामीण भागातील पहिली घंटागाडी या ग्रामपंचायतीने सुरू केली. विधायक कामासाठी महिला ग्रामसभा, ग्रामसभा, कोपरा सभा घेऊन ग्रामपंचायतीने लोकांचे प्रबोधन केले. त्यातून गाव प्लॅस्टिकमुक्त होण्यास मदत झाली. गावाची सांडपाणी, घनकचरा प्रकल्पासाठीही निवड झाली आहे.
गाव आदर्शवत करण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वखर्चाने घरोघरी कचराकुंड्या दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणीही कचराकुंड्यांचा वापर होत आहे. आठवडा सुट्टीत आजही गावात सर्व ग्रामस्थांमधून स्वच्छतेचा उपक्रम राबविला जातोय. गावातील सर्व उपक्रमांची दखल घेऊन शासनाने ग्रामपंचायतीस पंचायत सशक्तीकरण व राष्ट्रीय गौरव अभियानामधील राज्यातील प्रथम क्रमांक बहाल केला आहे.
दरम्यान, १६ फेबु्रवारीरोजी केंद्रीय पथकाकडून पाहणी होत असून सरपंच रामचंद्र पाटील, उपसरपंच संतोष लुगडे, ग्रामसेवक बी. एस. नागरगोजे, वैशाली पाटील, प्रकाश चव्हाण, मनीषा पाटील, शालन पाटील, शोभा लोहार, आनंदा पाटील यांच्यासह ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.
सामाजिक बांधिलकी
वाडीभागाई ग्रामस्थांनी आतापर्यंत जळीतग्रस्त, अपघातग्रस्तांना मदत, सामाजिक, सार्वजनिक कामात, तसेच जनहिताच्या कामात पुढाकार घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
‘‘गावाला राज्यपातळीवरील प्रथम क्रमांकाच्या मिळालेल्या पुरस्काराचे सर्व श्रेय ग्रामस्थांना आहे. गावात गट-तट न मानता विधायक कामे केली जात आहेत. देशपातळीवरीलही पुरस्कार निश्चित मिळेल’’
- रामचंद्र पाटील, सरपंच