सांगलीत हरिपूरजवळ वेटरचा खून, हल्लेखोर पसार; आठवड्यात दुसरी घटना

By घनशाम नवाथे | Published: December 4, 2024 01:38 PM2024-12-04T13:38:29+5:302024-12-04T13:38:49+5:30

खुनाच्या कारणाचा शोध सुरू

Waiter murdered near Haripur in Sangli, second incident in a week | सांगलीत हरिपूरजवळ वेटरचा खून, हल्लेखोर पसार; आठवड्यात दुसरी घटना

सांगलीत हरिपूरजवळ वेटरचा खून, हल्लेखोर पसार; आठवड्यात दुसरी घटना

सांगली : मागील आठवड्यात हॉटेलमधील वेटरचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच हरिपूर (ता. मिरज) येथे वेटर सूरज अलिसाब सिद्धनाथ (वय ३२, रा. पवार प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार घडला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर हरिपूर येथील गुळवणी महाराज मठाजवळ हा प्रकार घडला. खुनाचे नेमके कारण समजू शकले नसून सांगली ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिद्धनाथ कुटुंब मुळचे कर्नाटकातील बनहट्टी येथील आहेत. अनेक वर्षापूर्वी नोकरीच्या निमित्ताने ते सांगलीत राहत आहे. या कुटुंबातील सूरज हा पवार प्लॉटमध्ये राहत होता. त्याचा विवाह झाला आहे. हरिपूर येथील संगम हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करत होता. मध्यरात्रीनंतर तो सव्वा बाराच्या सुमारास दुचाकी (एमएच १० एएन २२३२) वरून घराकडे येत होता. हरिपूर येथील गुळवणी महाराज मठाजवळ त्याला हल्लेखोरांनी अडवले. त्याच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तो गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही धावले. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सूरज याच्यावर २४ वार झाले आहेत. खुनाचे नेमके कारण समजले नाही. बुधवारी सकाळपासून सांगली ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक हल्लेखोरांचा शोध घेत होते. लवकरच या खुनाचा छडा लागेल असे सांगण्यात आले.

आठवड्यात दुसरा खून

सांगलीत दि. २८ रोजी रात्री कोकणातील वेटर शैलेश राऊत याचा तिघांनी किरकोळ वादातून खून केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी दोघांना अटक केली असून अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले होते. त्यानंतर आठवड्यात दुसऱ्यांदा वेटरचा खून झाल्याने याची चर्चा सुरू आहे.

Web Title: Waiter murdered near Haripur in Sangli, second incident in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.