अनिकेतच्या मृत्यूच्या अहवालाची प्रतीक्षा-कोठडीत मारले.. आंबोलीत जाळले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:24 AM2017-12-29T00:24:57+5:302017-12-29T00:26:23+5:30
सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही.
सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही. त्याचा मृतदेह मिरजेच्या शासकीय महाविद्यालयाकडील शरीरशास्त्र विभागात तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याचा अहवाल दोन आठवड्यात प्राप्त होईल, असे सांगण्यात येत आहे. सीआयडीलाही त्याचा मृत्यू कशाने झाला, याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने १ जानेवारी २०१८ पर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. अनिकेत खून प्रकरणात आतापर्यंत सातजणांना अटक झाली आहे.
सीआयडीने संशयितांचे कॉल डिटेल्स मागविले होेते. घटनेच्या काळात संशयितांशी संपर्क केलेल्या सर्वांना सीआयडीने बोलावून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५४ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. सीआयडीने डीएनए चाचणीही केली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून मृतदेह हा अनिकेतचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी अनिकेतचा मृतदेह मिरज शासकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडे सुपूर्द करण्यात आला होता या विभागाकडून विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यांचा अहवाल पंधरा दिवसात प्राप्त होण्याची शक्यता आहे. या अहवालाची सीआयडीलाही प्रतीक्षा आहे.
कोथळे कुटुंबीय उज्ज्वल निकमना भेटणार
अनिकेत कोथळे खून प्रकरणात सरकारच्यावतीने अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीआयडीकडून आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अॅड. निकम खटल्याचे कामकाज हाती घेतील, असे सांगण्यात येत आहे. शनिवारी अॅड. निकम हे मिरजेत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. यावेळी कोथळे कुटुंबीय अॅड. निकम यांची भेट घेणार असल्याचे आशिष कोथळे यांनी सांगितले.