सांगली जिल्ह्यातील चोवीस हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना यादीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:46 PM2018-02-19T17:46:06+5:302018-02-19T17:49:02+5:30
कर्जमाफी योजनेअंतर्गत शेवटच्या टप्प्यात पात्र ठरलेल्या २४ हजार शेतकऱ्यांना पुढील यादीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या दोन दिवसांत नवी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
सांगली : कर्जमाफी योजनेअंतर्गत शेवटच्या टप्प्यात पात्र ठरलेल्या २४ हजार शेतकऱ्यांना पुढील यादीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या दोन दिवसांत नवी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार ग्रीन याद्यांनंतर राहिलेल्या ९० हजार शेतकऱ्यांची माहिती तपासणीनंतर पात्र ठरविलेल्या २८ हजार शेतकरी अर्जदारांपैकी जिल्ह्यातील चार हजार ३४४ शेतकऱ्यांची पाचवी ग्रीन यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये एकूण साडेसहा कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी कुटुंबांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले होते. कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाच्या चार याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामध्ये ९१ हजार १८९ शेतकऱ्यांना १८७ कोटी ३५ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली. याशिवाय २६ हजार शेतकरी ओटीएससाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी अद्याप सुमारे एक लाख शेतकरी प्रलंबित आहेत.