अठराशे कृषी पंपांना वीज कनेक्शनची प्रतीक्षा
By admin | Published: July 10, 2015 11:45 PM2015-07-10T23:45:24+5:302015-07-10T23:51:09+5:30
तासगाव तालुक्यातील चित्र : ठेकेदार शिरजोर; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप--महावितरणचा बट्ट्याबोळ -२
दत्ता पाटील -तासगाव तालुक्यात तासगाव १, तासगाव २ आणि सावळज असे महावितरण कंपनीचे तीन उपविभाग आहेत. या तीन विभागात कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केलेल्या अठराशे शेतकऱ्यांना चार-पाच वर्षांपासून कनेक्शन मिळालेले नाही. मार्च २०१४ पर्यंतच्या कनेक्शन जोडणीच्या वर्क आॅर्डर ठेकेदार कंपनीला देऊनही, अद्यापही वीज कनेक्शन मिळालेले नाही. महावितरणचे उंबरठे झिजवून शेतकरी हतबल झाला आहे. ठेकेदार कंपनीची शिरजोरी, महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांचा सुस्तावलेपणा यामुळे शेती पंपाच्या वीज कनेक्शनकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
काही वर्षांपूर्वी महावितरणच्या कामांसाठी जिल्हास्तरावरुन निविदा काढून कामे देण्यात येत होती. मार्च २०१२ नंतर जिल्ह्यात शेतीपंपाच्या वीज कनेक्शन जोडणीसाठी निविदाच काढण्यात आलेली नाही. त्यानंतर सप्टेंबर २०१३ मध्ये दोन वर्षांसाठी शलाका इन्फ्राटेक, पुणे या एकाच कंपनीला मुख्यालयातूनच निविदा मंजूर करुन काम देण्यात आले. महावितरणची सर्वच कामे या कंपनीकडे आहेत.
त्यामुळे या कंपनीकडून नव्याने फीडर जोडणी, ट्रान्स्फॉर्मर जोडणीपासून मोठ-मोठ्या निविदा असणाऱ्या कामांनाच प्राधान्य देऊन काम करण्यात येत आहेत. तालुक्यासह जिल्ह्यातील महावितरणची मोठ्या निविदेची कामे ठेकेदार कंपनीकडून तातडीने करण्यात येत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी सातत्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन उंबरठे झिजविले आहेत. मात्र सर्वच अधिकारी ठेकेदार कंपनीकडे बोट करुन, हात वर करीत आहेत.
२०११ मध्ये महावितरण आपल्या दारी अशी योजना शासनाकडून आणण्यात आली होती. या योजनेअंतर्गत मागेल त्याला वीज कनेक्शन देण्याची मोहीम सुरु करण्यात आली होती. त्यानुसार अर्ज करणाऱ्यांना सहा महिन्यांत
कनेक्शनही देण्यात आली. मात्र याच योजनेत समावेश असणाऱ्या तालुक्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापही वीज कनेक्शनसाठी महावितरणचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
मार्च २०१४ पर्यंत कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केलेल्या तालुक्यातील अठराशे शेतकऱ्यांना महावितरणकडून मंजुरी देण्यात आली. त्याबाबतची वर्क आॅर्डरही ठेकेदार कंपनीकडे देण्यात आली. मात्र कंपनीकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. याचवेळी शेतीत स्वत: खांब उभे करून जादा पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन मात्र तातडीने जोडली जात असल्याचे प्रकारही अनेक ठिकाणी दिसून येत आहेत.
शेतकऱ्यांना नियमानुसार अनामत रक्कम भरुन आणि कनेक्शन मंजुरी मिळूनही महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळेच उपेक्षा आलेली आहे. किमान शासनाने दखल घेऊन तातडीने कनेक्शन जोडून द्यावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
२०११ मध्ये शेतात खोदलेल्या कूपनलिकेला पाणी चांगले लागल्याचे दिसल्यानंतर, शेतीच्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केला. कनेक्शन मंजूर झाल्याचे पत्र कार्यालयाकडून आले. शेतात विजेचे खांब येऊन पडले. मात्र अजूनही कनेक्शन जोडण्यात आलेले नाही. कार्यालयात चौकशी केल्यावर मात्र अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जात आहे.
- चंद्रकांत पाटील,
बस्तवडे (ता. तासगाव)
दोनशे घरे अंधारात
घरगुती वापरासाठी कनेक्शन मिळण्याबाबत तालुक्यातून दोनशे अर्ज महावितरणकडे आलेले आहेत. या कनेक्शन्ससाठी खांब रोवण्याची आवश्यकता आहे. ही कनेक्शन्स देण्याबाबतही वर्क आॅर्डर देण्यात आलेली आहे. मात्र तरीही अद्याप कनेक्शन मिळालेली नसल्यामुळे दोनशे घरांत अद्यापही अंधाराचेच साम्राज्य आहे.