सांगली वस्तुसंग्रहालयास प्रशस्त जागेची प्रतीक्षाच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:52 PM2018-10-21T23:52:10+5:302018-10-21T23:52:15+5:30
शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक ठेवा असलेल्या सांगली वस्तुसंग्रहालयास सध्याची जागा अपुरी ...
शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक ठेवा असलेल्या सांगली वस्तुसंग्रहालयास सध्याची जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागेचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्यात आला आहे. सांगली शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील काही भाग या वस्तुसंग्रहालयासाठी मिळाल्यास जुनी ऐतिहासिक इमारत व त्यामध्ये दुर्मिळ ठेवा पाहण्याची दुहेरी संधी सांगलीकरांना मिळणार आहे. वस्तुसंग्रहालयास जागा मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असला तरी, नवीन जागेपेक्षा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतच सोयीस्कर ठरणार आहे.
राज्यातील १४ वस्तू संग्रहालयामध्ये सर्वात जुने व जगभरातील अनमोल ठेवा असलेले वस्तुसंग्रहालय सांगलीत आहे. औधनंतर सर्वात दुर्मिळ ठेवा सांगलीत आहे. सध्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच एका अरूंद व कमी जागेतच अनेक वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. यात पुरातन काळातील दस्तावेज, राजघराण्यातील व्यक्तींच्या वस्तू, त्यांची दुर्मिळ छायाचित्रे, जगभरातील वस्तूंचा समावेश आहे. सध्या याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांच्यावतीने वस्तुसंग्रहालयाची डागडुजी करण्यात येत असली तरी, पावसाळ्यात पाणी आत येऊन वस्तू इजा पोहोचण्याचा धोका निर्माण होत असतो. तसेच कमी जागा असल्याने अनेक वस्तू प्रदर्शनाविना झाकून ठेवाव्या लागत आहेत.
सांगलीत येणारे पर्यटक आवर्जून वस्तुसंग्रहालयास भेट देतात व त्याची पाहणी करतात. मात्र, बाहेर पार्किंगचीही योग्य सुविधा नसल्याने पर्यटकांचीही अडचण होते. शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने विद्यार्थीही आवर्जून या संग्रहालयास भेट देत असतात.
वस्तुसंग्रहालयाची सध्याची इमारत कमी पडत असल्याने प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकाºयांकडे नवीन जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार विजयनगर परिसरातच जागा देण्याबाबत कार्यवाही होणार होती. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातच वस्तुसंग्रहालय असणे पर्यटकांच्यादृष्टीने आवश्यक आहे. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातीलच काही भाग यास मिळाल्यास फायदा होणार आहे.
स्थलांतर झाल्यापासून संपूर्ण इमारत पडून होती. आता गेल्याच आठवड्यात मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम उपनिबंधकांना या इमारतीमधील काही भाग देण्यात आल्याने त्यांचे कामकाज सुरू झाले आहे.
अडगळीतील इमारतही प्रकाशात!
वस्तुसंग्रहालयास जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत मिळाल्यास दुर्मिळ वस्तूंबरोबरच ऐतिहासिक इमारतही पर्यटकांना पाहावयास मिळणार आहे. संग्रहालय विभागाकडून तिथे फर्निचर, सुरक्षा व्यवस्था व इतर सुविधा करून सुसज्ज वस्तुसंग्रहालय उभे राहू शकते. सध्या अक्षरश: धूळ खात पडलेल्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीलाही त्यामुळे गतवैभव प्राप्त होणार आहे.