निधीच्या तरतुदीनंतरही रेल्वे प्रवासी सुविधांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:48 PM2019-02-03T23:48:10+5:302019-02-03T23:48:15+5:30
सदानंद औंधे । लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : रेल्वे अंदाजपत्रकात पुणे विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी निधीची तरतूद होऊनही सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील ...
सदानंद औंधे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : रेल्वे अंदाजपत्रकात पुणे विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी निधीची तरतूद होऊनही सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात आवश्यक सुविधांबाबत प्रवासी उपेक्षितच आहेत. पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण वगळता रेल्वे प्रवाशांच्या अन्य मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची प्रवाशांची प्रतिक्रिया आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे रेल्वे अंदाजपत्रकात प्रवासी सुविधांसाठी निधी उपलब्ध झाला तरी, स्थानकांच्या विकासासाठी आवश्यक खर्च करण्यात येत नसल्याने प्रवाशांच्या मागण्या दुर्लक्षित आहेत. मिरज जंक्शन रेल्वेस्थानक प्रवासी सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. मिरज रेल्वेस्थानकातून दररोज ६५ रेल्वे गाड्यांद्वारे दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. रेल्वेस्थानकात पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयापर्यंत अपुऱ्या सुविधांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. दूषित पिण्याचे पाणी, प्लॅटफॉर्मवर शौचालयांची गैरसोय, अवैध खाद्य विक्रेते, भिकारी, व्यसनी, तृतीयपंथीयांचा प्रवाशांना उपद्रव सुरू आहे.
रेल्वेची रूग्णवाहिका नसल्याने वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याने जखमी प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. काही प्लॅटफॉर्म कमी उंचीचे व सदोष असल्याने आजारी, वृध्द, महिला व लहान मुलांची गैरसोय होते.
स्थानकात एकाच प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर आहेत. प्रवाशांचे साहित्य चोरी, लूटमार, रेल्वे तिकिटांचा काळाबाजार याकडे रेल्वे सुरक्षा दलाचे दुर्लक्ष आहे. स्वच्छतेसाठी खासगी ठेकेदाराचे स्वच्छता कर्मचारी अपुरे असल्याने स्थानकात अस्वच्छता आहे. प्लॅटफार्मवर कोच इंडिकेटर, सिंगललाईन डिस्प्ले व मुख्य प्रवेशद्वारासमोर सिक्सलाईन डिस्प्ले बसवण्यात यावेत व गर्दीच्यावेळी तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी.
प्लॅटफॉर्मवर औषधाचे दुकान सुरु करावे, मिरज स्थानकात २६ डब्यांची ६ पिटलाईन करावी, मिरज - बेळगाव - मिरज पॅसेंजरप्रमाणे मिरज-सातारा-मिरज व मिरज-पंढरपूर-मिरज अशी दिवसभरात ३ तासाच्या अंतराने पॅसेंजर सुरु करावी, पुणे-कोल्हापूर पॅसेंजर सकाळी सुरु करावी, मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजरचा सोलापूरपर्यंत, सोलापूर-मिरज एक्स्प्रेसचा कºहाडपर्यंत कोल्हापूर-मिरज पॅसेंजर किर्लोस्करवाडीपर्यंत असा विस्तार करण्याच्या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
गेल्या वर्षभरात मिरज व कोल्हापूर स्थानकातून नवीन एक्स्प्रेस सुरू झालेल्या नाहीत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे रेल्वेचा मिरज स्वतंत्र विभाग करावा किंवा मध्य रेल्वेतून दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाला जोडण्याची व रेल्वे अंदाजपत्रकात उपलब्ध निधीचा रेल्वे स्थानकांच्या सुधारणेसाठी वापर करण्याची प्रवासी संघटनांची मागणी आहे.
पुणे-मिरज दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी अंदाजपत्रकात ५२३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने गतवर्षीची रक्कम अद्याप खर्च झालेली नाही.