व्यवसाय परवाना फी दंडामध्ये माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:33+5:302021-04-20T04:28:33+5:30
सांगली : महापूर, कोरोनामुळे नुकसान झालेल्या व्यापार्यांना सोमवारी महापालिकेच्या वतीने दिलासा देण्यात आला. या व्यावसायिकांच्या परवाना शुल्कावरील दंड व ...
सांगली : महापूर, कोरोनामुळे नुकसान झालेल्या व्यापार्यांना सोमवारी महापालिकेच्या वतीने दिलासा देण्यात आला. या व्यावसायिकांच्या परवाना शुल्कावरील दंड व व्याज माफ करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. तसेच कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणार्या आशा वर्कर्सना दरमहा पाच रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महापालिकेची सभा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत महापालिका क्षेत्रातील विविध प्रकारचे व्यवसाय परवान्यावरील दंड व व्याज माफीचा विषय अजेंड्यावर होता. यावेळी संतोष पाटील यांनी सर्वच परवानाधारकांचा दोन वर्षांचा दंड माफ करावा, यापुढे पाच वर्षांसाठी शुल्क भरून परवाना द्यावा, फक्त दोन वर्षांचा दंड माफ करावा अशी मागणी केली. शेखर इनामदार म्हणाले की, महापूर, कोरोनामुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परवाना फी भरून घेताना किमान दंड, व्याज माफ करून दिलासा द्यावा. संजय मेंढे यांनी साडेआठ हजार नोंदणीकृत व्यापार्यांना महासभेच्या मान्यतेपूर्वीच सवलत दिल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावर आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावर महापौर सूर्यवंशी यांनी आंबोळे यांना समज दिली. अखेर गेल्या तीन वर्षांसाठी दंड व व्याज माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
महापालिका क्षेत्रात २०२ आशा वर्कर्स कमी मानधनात काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांना दरमहा पाच हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला.
चौकट
आशांच्या मानधन वाढीची मागणी
अभिजित भोसले यांनी कल्याण-डोंबिवली, नांदेड महापालिकेच्या धर्तीवर आशा वर्कर्सना दहा हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी केली. शुभांगी साळुंखे, गीतांजली ढोपे-पाटील यांनी बालवाडी शिक्षिकांच्या मानधनात वाढ करण्याची उपसूचना मांडली. महापौर सूर्यवंशी यांनी सर्व उपसूचनेसह हा विषय मंजूर केला.