वरिष्ठांच्या पत्रानंतर ‘सागरेश्वर’मधील अधिकाऱ्यांना जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:54+5:302020-12-08T04:23:54+5:30
देवराष्ट्रे : कडेगाव-पलूसचे प्रांताधिकारी व कडेगाव तहसीलदार यांनी सागरेश्वर अभयारण्यातील प्रशासनाला पत्र काढून बिबट्याबाबत नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी काय उपाययोजना ...
देवराष्ट्रे : कडेगाव-पलूसचे प्रांताधिकारी व कडेगाव तहसीलदार यांनी सागरेश्वर अभयारण्यातील प्रशासनाला पत्र काढून बिबट्याबाबत नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा केली. यानंतर सागरेश्वर अभयारण्यातील वनक्षेत्रपाल यांना जाग आली व त्यांनी तब्बल १७ दिवसांनी परिसरातील ग्रामपंचायतींना पत्र काढून नागरिकांनी बिबटयापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.
सागरेश्वर अभयारण्यात २१ नोव्हेंबर रोजी बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला. तेव्हापासून अभयारण्य परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत, पण वनविभागाने कोणतीही हालचाल केली नाही. गांधारीच्या भूमिकेत राहून वनप्रशासन वेळ मारून नेत होते. अखेर कडेगाव-पलूसचे प्रांताधिकारी व कडेगाव तहसीलदार यांनी सागरेश्वर अभयारण्यातील वनप्रशासनाला विचारणा केल्यावर ते खडबडून जागे झाले. तब्बल १७ दिवसांनंतर परिसरातील देवराष्ट्रे, मोहित्याचे-वडगाव, आसद, कुंभारगाव, ताकारी, घोगाव ग्रामपंचायतींना पत्र देऊन नागरिकांनी बिबट्यापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल अ. नि. करे यांनी केले आहे.
चौकट
सागरेश्वर घाटात बिबट्याच्या पाऊलखुणा
रविवारी रात्री बारा वाजता चारचाकीच्या पुढून बिबट्या गेल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्याची शहानिशा करण्यासाठी सागरेश्वर अभयारण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी सागरेश्वर घाटातील ताकारी योजनेचा टप्पा क्र २ जवळ पाहणी केली असता, अभयारण्याबाहेरील परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत
चौकट
मुलांना एकटे सोडू नका
सागरेश्वर अभयारण्य परिसरातील वस्ती, घरा गत परिसर स्वच्छ ठेवावा, शेतात जाताना एकत्र जावे. काठी, बॅटरी घेऊन जावे, कुत्रा, मांजर घुस हे बिबट्याचे खाद्य आहे. तो खाण्यासाठी घर, वस्ती परिसरात येऊ शकतो. त्यामुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी दक्ष रहावे. लहान मुलांना एकटे सोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.