‘वाकुर्डे’ची अश्वशक्तीवर आधारित वसुली

By Admin | Published: May 8, 2016 12:32 AM2016-05-08T00:32:25+5:302016-05-08T00:32:25+5:30

शेतकऱ्यांना नोटिसा : वीज बिल वसुलीची अंतिम मुदत १२ मेपर्यंत

'Wakurde' horsepower based recovery | ‘वाकुर्डे’ची अश्वशक्तीवर आधारित वसुली

‘वाकुर्डे’ची अश्वशक्तीवर आधारित वसुली

googlenewsNext

विकास शहा ल्ल शिराळा
वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या वीज बिलाबाबत शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पंपांसाठी प्रती अश्वशक्ती दोन हजार रुपये आगाऊ रक्कम भरण्याबाबत पाटबंधारे विभागाने नोटिसा दिल्या आहेत. ही आगाऊ रक्कम दि. १२ मेपर्यंत न भरल्यास वीज खंडित केली जाण्याचा इशाराही देण्यात आल्याने संतापाचे वातावरण पसरले आहे.
सध्या तालुक्यात दुष्काळाचे सावट आहे. पिकांना हवे तेवढे पाणी उपलब्ध होत नाही. वाकुर्डे सिंचन योजनेचे पाणी खिरवडे व हत्तेगाव या दोन पंपहाऊसमधून आणून करमजाई तलावात सोडले आहे. त्यापैकी ६५ टक्के पाणी शिराळा व ३५ टक्के पाणी कऱ्हाड तालुक्यात वापरले जाते. त्यादृष्टीने या दोन पंपहाऊसच्या वीज बिलाची विभागणी केली जाते. हे दोन्ही पंपहाऊस २४ तास सुरू ठेवल्यास सव्वालाख रुपयांपर्यंत वीज बिल येते. २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ या तीन वर्षात २० ते २५ लाख रुपये बिल आले आहे. मात्र यावर्षी पाणीटंचाईमुळे २ डिसेंबरपासून पंपहाऊस सुरू आहेत. त्यामुळे आजअखेर ९५ लाख रुपयांचे वीज बिल आहे. तीन वर्षाच्या वसुलीतील २० लाख रुपये या वीज बिलापोटी भरले आहेत. शेतकऱ्यांकडून गेल्या तीन वर्षातील १४ लाख रुपये थकबाकी आहे.
यावर्षी वीज बिल जास्त असल्याने पंपांसाठी प्रती अश्वशक्ती दोन हजार रुपये आगाऊ वीज बिले भरण्याविषयी नोटीस काढण्यात आली आहे. ही रक्कम १२ मेपर्यंत न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे. कऱ्हाड तालुक्यातील दोन हजार हेक्टर, तर शिराळा तालुक्यातील ५०९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते, मात्र पाणी वापर शिराळा तालुक्यात जास्त होतो. कऱ्हाड तालुक्यात पहिल्यापासूनच अश्वशक्ती वीज बिल आकारणी होत आहे. गेले तीन वर्षे शिराळा तालुक्यात भिजणाऱ्या क्षेत्रावर, तर कऱ्हाड तालुक्यात अश्वशक्तीवर वीज बिल आकारणी होत आहे. एकाच योजनेचे पाणी वापर वीज बिलाबाबत हा फरक का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या फरकामुळे शिराळा तालुक्यावर आर्थिक बोजा बसत आहे. पाटबंधारे विभाग एकच असताना वीज आकारणीबाबत हा दुजाभाव का, असा प्रश्न आहे.
कऱ्हाड तालुक्यात अश्वशक्तीवर वीज आकारणी झाल्याने तसेच तेथील काही लोकांनी या वीज बिलाच्या वसुलीची जबाबदारी घेतल्याने तेथे पूर्ण वसुली होत आहे. मात्र शिराळा तालुक्यात भिजणाऱ्या क्षेत्रावर आकारणी होत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जावे लागत आहे. त्यामुळे वसुलीत अडथळा येत आहे. परिणामी आता अश्वशक्तीवर आधारित आगाऊ वसुली पाटबंधारे विभागाने चालू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे.
५०१ दशलक्ष पाण्याचा वापर
यावर्षी वाकुर्डे योजनेतून ५०१ दशलक्ष घनफूट पाणी उचलले असून, ३१५ दशलक्ष घनफूट पाणी शिराळा तालुक्यात, तर १८६ दशलक्ष घनफूट पाणी कऱ्हाड तालुक्यात वापर झाला आहे. तसेच ४९ दशलक्ष घनफूट पाणी करमजाई तलावात असून, त्याचा वापर शिराळा तालुक्याला होणार आहे.
पाटबंधारे विभागास संस्थेचे पत्र
वाकेश्वर पाणी पुरवठा वाकुर्डे खुर्द या योजनेचे १६० अश्वशक्ती पंप आहेत. मात्र नोव्हेंबर २०१५ पासून पाणीच शेतीसाठी मिळाले नाही. त्यामुळे वीज बिल आकारु नये, असे पत्र पाटबंधारे विभागास या संस्थेने दिले आहे.
 

२०१५-१६ वर्षासाठी शिराळा तालुक्यात सहा हजार अश्वशक्ती, तर कऱ्हाड तालुक्यात १८६८ अश्वशक्ती वीज वापर होत आहे. शिराळा तालुक्यातील सहा हजार अश्वशक्तीसाठी दोन हजार रुपये प्रती अश्वशक्ती आगाऊ वीज बिलाबाबत नोटीस निघाली आहे.
- पांडुरंग कदम, उपअभियंता, शिराळा विभाग
 

कऱ्हाड तालुक्यात अश्वशक्तीमुळे १०० टक्के वसुली होते, मात्र शिराळा तालुक्यात भिजणाऱ्या क्षेत्रावर आकारणी होत आहे. त्यामुळे ४०० ते ५०० रुपयांपासूनच्या वसुलीसाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे जावे लागते. यावर्षी २ डिसेंबरपासनूच या योजनेचे पाणी उचलले जात आहे. त्यामुळे ९५ लाख रुपये वीज बिल आले आहे. ही मोठी रक्कम असल्यानेच आगाऊ रकमेबाबत नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे घेण्यात आला आहे.
- के. ए. किनलेकर, पंपहाऊस विभाग, वाकुर्डे योजना

Web Title: 'Wakurde' horsepower based recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.