शहरातील भिंती बोलू लागल्या, उड्डाणपुलावर चितारल्या ऐतिहासिक वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:21+5:302021-03-06T04:25:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : स्वच्छ सांगली, सुंदर सांगली, असे बोधवाक्य असलेल्या शहराच्या सौंदर्यात भर पडू लागली आहे. महापालिका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्वच्छ सांगली, सुंदर सांगली, असे बोधवाक्य असलेल्या शहराच्या सौंदर्यात भर पडू लागली आहे. महापालिका क्षेत्रातील शासकीय व सार्वजनिक इमारती, क्रीडांगणे यांच्या भिंतींना नवा रंग चढला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी या भिंतींचे रंगकाम करण्याची सूचना केली. या भिंती आता बोलू लागल्या आहेत. विश्रामबाग उड्डाणपुलावर शहरातील ऐतिहासिक इमारतींची चित्रे लक्ष वेधून घेत आहेत.
शहरात आल्यानंतर नागरिकांच्या मनातील नकारात्मक भाव जाऊन सौंदर्यवृद्धीतून त्यांचे स्वागत व्हावे, यासाठी मुख्य रस्त्यावरील भिंती रंगवून सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियनात सांगली महापालिका राज्यात नवव्या, तर देशात ३६ व्या क्रमांकावर होती. हे अभियान सुरू झाल्यापासून प्रथमच हे मानांकन महापालिकेला मिळाले होते. त्यामुळे यंदा पहिल्या दहामधील स्थान टिकवून ठेवण्यासोबत मानांकन सुधारण्याचे आव्हानही महापालिकेसमोर आहे.
शहरातील मुख्य रस्त्याकडेला असलेल्या सार्वजनिक इमारती, शासकीय कार्यालये, क्रीडांगणांच्या भिंती घाणीने माखलेल्या होत्या. जागोजागी घाणीच्या, पिचकारीच्या खुणा होत्या. या भिंती रंगवण्याचे काम पंधरा दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले. आतापर्यंत शंभरावर भिंती रंगविण्यात आल्या आहेत. या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. कचरा वर्गीकरण, कोरोनात घ्यावयाची खबरदारी, स्वच्छतेसह अनेक संदेश भिंतीवरील चित्रातून देण्यात येत आहेत.
चौकट
उड्डाणपूल बनला आकर्षक
विश्रामबाग उड्डाणपुलाच्या संरक्षक कठड्यावर रंगकाम करण्यात आले आहे. यात शहरातील ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वास्तूंच्या चित्रांचा समावेश आहे. आयर्विन पूल, राजवाडा, गणपती मंदिर, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, जुने न्यायालय, विलिंग्डन महाविद्यालय अशा इमारती चितारल्या आहेत. त्यामुळे पुलाचे रुपडे बदलले आहे.