माधवनगरसह सात गावांत पाण्यासाठी भटकंती
By Admin | Published: May 5, 2017 11:23 PM2017-05-05T23:23:06+5:302017-05-05T23:23:06+5:30
माधवनगरसह सात गावांत पाण्यासाठी भटकंती
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महावितरणने २५ लाखांच्या वीज बिल थकबाकीपोटी वीज पुरवठा तोडल्याने माधवनगरसह चार गावांची पाणी योजना बंद होऊन १२ दिवस पूर्ण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरु आहे. माधवनगर व बुधगाव या गावांनी थोडीफार रक्कम जमा केली आहे. पण कवलापूर व बिसूरने अद्याप एक रुपयाही जमा केला नसल्याने, अजून सहा ते सात दिवस पाणी येणार नसल्याची शक्यता आहे.
कधी जलवाहिनीला गळती, तर कधी वीज पुरवठा बंद, या कारणामुळे माधवनगरची पाणी योजना सातत्याने बंदच राहिली आहे. वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ ४० ते ४५ वेळा माधवनगर, बुधगाव, कवलापूर व बिसूर या गावात पाणी येते. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झाली. लोकप्रतिनिधी व उमेदवारांनी पाणीप्रश्न सोडविण्याची हमी दिली. पण गेल्या १२ दिवसांपासून या गावात पाणी नाही, याची साधी चौकशीही त्यांनी केली नाही. मे महिना असल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकेवर दहा ते पंधरा मिनिटे हापसल्यानंतर एक घागर पाणी येत आहे. कूपनलिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र उन्हाळ्यामुळे पाणीच येत नसल्याने ग्रामस्थांना सायकलला कॅन, घागरी अडकवून आसपासच्या शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.
कवलापूरला एका तरुणाने वीस रुपयाला ४० लिटर घरपोच पाणी, अशी योजना सुरु केली आहे. हा तरुणही बाहेरुन कूपनलिकेचे पाणी आणून लोकांची तहान भागवत आहे. ज्या घरगुती कूपनलिकांना पाणी आहे, तिथे एक रुपयाला २० ते ३५ लिटरचा एक प्लॅस्टिकचा कॅन भरुन पाणी दिले जात आहे. तिथे पाण्यासाठी २४ तास गर्दी आहे. खर्चाच्या पाण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेऊन माधवनगर, बुधगाव ग्रामपंचायतीने चार-पाच लाख रुपयांची जुळवाजुळव केली आहे. अजूनही बिल भरण्यास तीन-चार लाख रुपये कमी पडतात. कवलापूर व बिसूरने ही रक्कम दिली असती, तर आतापर्यंत योजना सुरु झाली असती. बिसूरकरांची ६० हजारची जुळणी झाली आहे. कवलापूरकर मात्र, अजून जुळणी झाली नाही, असे सांगून हात वर करत आहेत. त्यांच्यामुळे योजना सुरु होण्यास विलंब होत आहे.
कवलापुरात सोसायटीचा आधार
कवलापूर येथे विकास सोसायटीने गतवर्षी शुद्धपेय जल योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत एक रुपयाला २० लिटर पाण्याची विक्री केली जात आहे. सभासद झाल्यास सोसायटी एटीएम कार्ड देते. या कार्डद्वारे पाच रुपयांना २० लिटर आणि कार्ड नसेल, तर पाच रुपयाचे क्वाईन टाकून दहा लिटर पाणी घेता येते. गेल्या १२ दिवसांपासून पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी सोसायटीमध्ये सकाळी सहापासून ते रात्री बारापर्यंत ग्रामस्थांच्या रांगा लागलेल्या असतात. उन्हाळ्यामुळे सोसायटीच्या कूपनलिकेला पाणी कमी येत आहे. ग्रामस्थांची गैरसोय नको, म्हणून सोसायटीने बाहेरून दररोज पाच हजार लिटरचे चार ते पाच टँकर खरेदी करुन शुद्ध पेय योजना नियमित सुरु ठेवली आहे.