वांगीचे प्राथमिक आरोग्य केंद्र अद्याप बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:35+5:302020-12-22T04:25:35+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात २४ ऑक्सिजन ...
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात २४ ऑक्सिजन बेड्सचीही सोय केली आहे. वीज व पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. तरीही हे आरोग्य केंद्र सुरू झालेले नाही. हे आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कोरोनाच्या काळात या ठिकाणी तातडीने कोविड सेंटर चालू करण्याचे प्रयत्न प्रशासनाने केले होते. मात्र तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या घटल्यामुळे पुन्हा वांगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष झाले आहे. वांगी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते यांच्या प्रयत्नामुळे व तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी भागातील लोकांचे उपचाराविना होणारे हाल पाहून विशेष बाब म्हणून हे प्राथमिक आरोग्य केंद्र २०१४ मध्ये मंजूर केले. ३ कोटी रुपये निधी तत्काळ वर्ग करुन कामास प्रारंभ झाला. या आरोग्य केंद्रातील सर्व कामे पूर्ण होऊन साधारण चार महिने झाले आहेत. वीज व पाण्याची सोय आहे. तरीही आरोग्य केंद्र बंद आहे.
या केंद्राचा वांगी, शिवणी, शेळकबाव, शिरगाव, रामापूर, अंबक आदी गावांतील गरजू रुग्णांना फायदा होणार आहे. ऑक्टोबरमध्ये कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे हे आरोग्य केंद्र तातडीने सुरु होईल, असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र प्रशासनाने या आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष केले आहे.
फोटो-२१वांगी०१