मिरजेतील बंद पडलेल्या ‘वॉन्लेस’ हॉस्पिटलला नवसंजीवनी, तमिळनाडूतील वेल्लोरच्या पथकाकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 01:51 PM2023-08-10T13:51:35+5:302023-08-10T13:51:49+5:30
‘वैद्यकीय पंढरी’ अशी ओळख असलेल्या मिरजेतील वैद्यकीय व्यवसायाला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे.
मिरज : मिरजेतील बंद असलेल्या वॉन्लेस हॉस्पिटलचे वेल्लोर तमिळनाडू येथील ख्रिश्चन मेडिकल काॅलेजकडे हस्तांतरण होणार आहे. वेल्लोर येथील पथकाने मिरजेत येऊन वॉन्लेसची पाहणी केली. त्यामुळे वॉन्लेस हाॅस्पिटल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
मिरजेतील सुमारे १३० वर्षांची रुग्णसेवेची परंपरा असलेले ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीमुळे बंद आहे. त्यामुळे रुग्णालयातील पाचशे कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीवर आहे. गेले वर्षभर पगार मिळाला नसल्याने रुग्णालय कर्मचारी हवालदिल आहेत. थकबाकीमुळे रुग्णालयाचा वीज व पाणीपुरवठा खंडित होण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल काॅलेज व हाॅस्पिटलकडे वाॅन्लेस रुग्णालयाच्या हस्तांतरणाबाबत चाचपणी सुरू आहे.
‘वैद्यकीय पंढरी’ अशी ओळख असलेल्या मिरजेतील वैद्यकीय व्यवसायाला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. अमेरिकन मिशनरी डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी १८९४ मध्ये मिरजेत वॉन्लेस (मिशन) रुग्णालयाची स्थापना करून आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीचा प्रारंभ केला. डॉ. वॉन्लेस यांनी आपल्या उपचाराने हजारो रुग्णांवर उपचार केले. डॉ. वॉन्लेस यांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, नटसम्राट बालगंधर्व यांच्यावरही उपचार केले होते.
१९६२ मध्ये मिशन रूग्णालयाच्या सहकार्याने मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवर लोक मिरजेला उपचारासाठी येत असल्याने मिशनचा राज्यात व देशातही लौकिक होता. मात्र गतवर्षापासून आर्थिक अडचणींमुळे बंद पडलेल्या ऐतिहासिक मिशन हॉस्पिटलचे अस्तित्व धोक्यात असल्याने तमिळनाडूतील ख्रिश्चन मेडिकल काॅलेज या संस्थेकडे मिशन हाॅस्पिटलचे हस्तांतरणाच्या हालचाली सुरु आहेत.
यासाठी वेल्लोर येथील २० जणांच्या पथकाने मिरजेत मिशन रुग्णालयास भेट देऊन तीन दिवस पाहणी केली. हे पथक वेल्लोर येथील संचालक मंडळाला अहवाल देणार असून त्यानंतर वाॅन्लेस रुग्णालय वेल्लोरच्या अधिपत्याखाली पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे बंद असलेले मिशन रुग्णालय पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.