दुसऱ्याच्या सुखात आनंद मानण्याची सवय हवी
By admin | Published: July 20, 2014 11:35 PM2014-07-20T23:35:13+5:302014-07-20T23:43:54+5:30
धनंजय गुंडे : जैन मंदिरात आयोजित सत्संग सोहळ्यात
सांगली : सध्याच्या काळात बहुतेकांचा व्यवहार हा स्वकेंद्रित झाला आहे. आपण समाजाचा घटक आहोत हे कायम लक्षात ठेवून, दुसऱ्या व्यक्तींच्या सुखात आनंद मानण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे, असे आवाहन डॉ. धनंजय गुंडे यांनी केले. शहरातील दत्तनगरमध्ये श्री १००८ भ. शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात आयोजित सत्संग सोहळ्यात ‘हे जगणे आनंदाचे’ या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर विद्यानंदीजी महाराज उपस्थित होते.
चातुर्मासानिमित्त जैन मंदिरात सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. गुंडे पुढे म्हणाले, यश मिळविण्यासाठी प्रत्येकाने पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर यश मिळाले नाही दु:ख करीत बसण्याचे कारण नाही.
जगात सध्या धर्माच्या आधारावर युध्द सुरु आहे. परंतु धर्म म्हणजे कर्तव्यपालन, हा भावार्थ कोणी लक्षातच घेत नाही. प्रत्येक व्यक्तीने त्याचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, तर संपूर्ण जगातच शांतता नांदण्यास वेळ लागणार नाही. धावपळीच्या युगात देशाचे आधारस्तंभ असलेली युवक पिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. त्यांचा ओढा फास्ट फुडकडे वाढत चालला आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे.
प्रत्येकाने मांसाहाराचा त्याग करुन शाकाहाराकडे वळले पाहिजे. शाकाहार हा सात्त्विक आहार आहे. आपण ज्याप्रकारचे अन्न खातो, त्याप्रकारची आपली वृत्ती तयार होते. दैनंदिन जीवनात काम, क्रोध, मोह, माया यापासून सर्वांनीच लांब राहिले पाहिजे, असेही डॉ. गुंडे यांनी सांगितले.
प्रास्ताविक अजय कारंजे यांनी केले. डॉ. गुंडे यांचा सत्कार कुमार तिप्पाणावर यांनी केला. सत्संग सोहळ्याच्या अखेरीस विद्यानंदीजी महाराजांनी श्रावक, श्राविकांना आशीर्वचन दिले. वीरमाता महिला मंडळाने जीनवाणी स्तुती करुन सोहळ्याची सांगता केली. (प्रतिनिधी)