ऊसतोड पाहिजे? एकराला चार हजार द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:44+5:302021-01-08T05:24:44+5:30
साखर कारखान्यांकडून ऊसतोडणी मजुरांना प्रतिटन २३७ रुपये ४६ पैसे बैलगाडीमागे, तर ट्रक, ट्रॅक्टरच्या मजुरांना प्रतिटन २७३ रुपये १४ पैसे ...
साखर कारखान्यांकडून ऊसतोडणी मजुरांना प्रतिटन २३७ रुपये ४६ पैसे बैलगाडीमागे, तर ट्रक, ट्रॅक्टरच्या मजुरांना प्रतिटन २७३ रुपये १४ पैसे दिले जात आहेत. यावर मुकादमाला वेगळे १९ टक्के कमिशन दिले जाते. या मजुरांचा आणि वाहतुकीचा खर्चही शेतकऱ्यांकडूनच वसूल केला जातो. पुन्हा खुशीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून काही ऊसतोड मजुरांच्या टोळ्या कारखाना कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एकरी दोन ते चार हजार रुपये घेत आहेत. ट्रॅक्टर, ट्रकच्या चालकांनाही पैसे द्यावे लागत आहेत. कारखाना प्रशासनाने ऊस तोडणीचे वेळापत्रक पाळले, तर ही लूट थांबू शकते. प्रथम आडसाली लागण, सुरु हंगामी आणि खोडवा असे कारखान्यांचे तोडणीचे वेळापत्रक आहे. याचे पालन होत नसल्यामुळेच ऊसतोडणी मजूर गैरफायदा घेऊन लूट करीत आहेत, अशा तक्रारी आहेत.
चौकट
खुशीने दिले, तरच घेतो : सुरेश वणवे
ऊसतोड मजुरांना कारखान्यांकडून प्रतिटनाला पैसे मिळत आहेत. नियमानुसार ५० टक्के उसाचे वाडे मजुरांना मिळते. काही ठिकाणी वाडे आम्हाला द्या, म्हणून शेतकरी मजुरांना पैसे देत आहेत. काही शेतकरी खुशीने चारशे-पाचशे रुपये देतात. अन्यथा आम्ही कोठेही सक्तीने पैसे घेत नाही, अशी प्रतिक्रिया गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचे राज्य सहसचिव सुरेश वणवे यांनी दिली.
चौकट
मजुरांनी वेठीस धरू नये : अरुण लाड
नोंदणीनुसार ऊस तोडणार असून शेतकऱ्यांनी चिंता करू नये. मजुरांना कोणीही पैसे देऊ नयेत. बैलगाडीचालकांना कारखाने मजुरी देत आहेत. त्यामुळे अन्य पैसे देण्याची गरज नाही. एखादा मजूर पैसे मागत असेल तर त्याबाबत कारखान्याकडे तक्रार करावी, असे आवाहन क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी केले.
चौकट
मजुरांना कारखान्यांकडून मिळणारी मजुरी
- बैलगाडी मजूर प्रतिटन २३७ रुपये ४६ पैसे
- ट्रॅक्टरच्या मजुरांना प्रतिटन २७३ रुपये १४ पैसे
- मजुरांच्या मजुरीवर १९ टक्के मुकादमांना कमिशन
- यंत्राद्वारे ऊस तोडीसाठी प्रतिटन ३८० रुपये