वाळवा तालुक्यात संस्थात्मक विलगीकरण कक्षांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:37+5:302021-05-21T04:27:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यामध्ये शासकीय यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यामध्ये शासकीय यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या १९०० रुग्ण घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. मात्र याच रुग्णांकडून नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाचा फैलाव वाढत आहे. आता प्रशासनाने पुढाकार घेत संस्थात्मक विलगीकरणाचे कक्ष सुरू करणे गरजेचे आहे.
इस्लामपूर आणि आष्ट्यासह तालुक्यात एकूण १८ कोविड उपचार केंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी १७५ आयसीयू बेड आणि ५२४ ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहिल्यास ही सुविधासुद्धा अत्यंत तोकडी पडत आहे. त्यामुळेच सौम्य अथवा कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यातूनच तालुक्यात जवळपास १९०० रुग्ण घरी राहूनच उपचार घेत आहेत. या रुग्णांकडून कुटुंबासह आजूबाजूच्या व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग दिला जात आहे.
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात सुरू झालेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनासह सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, सहकारी संस्थांनी पुढाकार घेत अनेकविध उपायांची अंमलबजावणी केली होती. पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरून नागरिकांना घरी बसवून ठेवण्यात यश मिळविले होते. प्रशासनाच्या पातळीवर गावागावातून संस्थात्मक विलगीकरणाचे कक्ष स्थापन करून फैलाव होणार नाही, याची दक्षता घेतली होती.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पहिल्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन उपाययोजना राबविण्याची गरज होती. मात्र प्रशासनाच्या यंत्रणामध्ये समन्वयाचा अभाव राहिल्याने वाळवा तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने हा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.