युतीच्या अस्तित्वाचीच इस्लामपूरमध्ये लढाई -: विधानसभेच्या नव्या समीकरणांची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:48 AM2019-03-19T00:48:16+5:302019-03-19T00:51:34+5:30
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या या बालेकिल्ल्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या
युनूस शेख ।
इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या या बालेकिल्ल्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या इस्लामपूरवर भाजप-सेना आणि विकास आघाडीने कब्जा मिळवला आहे. विधानसभेची रंगीत तालीम म्हणून जयंत पाटील विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीत जोर लावला जाणार आहे.
गत लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना येथून मिळालेले २३ हजार ४४५ मतांचे अधिक्य टिकेल का, याची उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-सेनेची साथ करताना शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीचा विरोध पत्करून हे मताधिक्य मिळवले होते. यावेळी शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने यांचे नाव पुढे येत आहे, तर रयत क्रांती आघाडीकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत रिंगणात उतरण्यासाठी धडपडत आहेत.
लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीच्या साखर कारखानदारांच्या पट्ट्यात दोनवेळा धोबीपछाड देत खासदारकी पटकावली. शेतकऱ्यांसाठी झगडणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आणि ऊस दरासाठी केलेली आंदोलने ही मतदारांच्या मनावर भुरळ पाडणारी ठरली. येत्या निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीबरोबर त्यांची चर्चा सुरू आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या पक्षात विरोधक विखुरले असले तरी, आ. जयंत पाटील यांना विरोध या मुद्यावर सर्वांचे एकमत होते. ‘स्वाभिमानी’तून बाहेर पडल्यानंतर रयत क्रांती आघाडीची स्थापना केलेले सदाभाऊ खोत वर्षभरापासून शेट्टींविरोधात रान तापवत होते. हातकणंगलेतून लढणारच याचाही त्यांनी वारंवार उच्चार केला होता; मात्र वरिष्ठ पातळीवर युतीच्या चर्चेत हा मतदारसंघ शिवसेनेला गेला आहे. यापूर्वी शेट्टींसोबत असणारे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक, हुुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, नगरसेवक विक्रम पाटील, गौरव नायकवडी, सेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि तोकड्या ताकदीवर नेहमीच समाधानी राहिलेले काँग्रेसचे पदाधिकारी आता त्यांच्याविरोधात जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शेट्टींचे या सर्वांशी असणारे स्नेहपूर्ण संबंध याही निवडणुकीवेळी उपयुक्त ठरावेत यासाठी ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी त्यांच्या संपर्कात राहत आहेत.
राजू शेट्टींना नेहमीच अधिक्य
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून गत लोकसभेला खा. राजू शेट्टी यांना ९५ हजार ३९२ मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांना ७१ हजार ९४७ मते मिळाली होती. या निवडणुकीत शेट्टी यांनी २३ हजार ४४५ मतांचे अधिक्य घेतले होते.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ
स्त्री मतदार- १,३१,0१३ च्पुरुष मतदार-१,३७,0७३
एकूण मतदार— २,६८,0८६