साताऱ्याजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, सांगलीतील एकजण ठार; आठवड्यातील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 11:54 AM2022-06-21T11:54:58+5:302022-06-21T13:10:13+5:30
दोनच दिवसांपूर्वी वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात होऊ एक वारकरी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला आहे.
सातारा: दोनच दिवसांपूर्वी वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात होऊ एक वारकरी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून, तीन वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रायगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत आज, मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.
भीमराव कोंडिबा पवार (वय ८०, रा.वडीये रायबाग, ता. कडेगाव जि.सांगली)असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध वारकऱ्याचे नाव आहे. अपघातातील मृत व जखमी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील रहिवाशी आहेत. या घटनेनंतर कडेगाव परिसरात शोककळा पसरली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अनेक गावातील वारकरी आळंदी येथे ज्ञानेश्वर माउलीच्या पालखी सोहळयासाठी ट्रकने निघाले होते. यावेळी पहाटेच्या सुमारास महामार्गावरील गौरीशंकर कॉलेज ते रायगाव फाटा दरम्यान वारकऱ्यांच्या ट्रकचा अचानक टायर फुटला. याचवेळी पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने (एमएच ४६ बीबी २२४१) वारकऱ्यांच्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकच्या पाठीमागे बसलेले भीमराव पवार हे जागीच ठार झाले.
तर अशोक मोहिते (वय ५५), नंदकुमार महाराज पवार (७०), माउली माने (९०, सर्व रा. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली) हे वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच वाईच्या पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, महामार्ग पोलीस, भुईज पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात याबाबत अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.