वारांगनाचा खून पैशाच्या वादातून

By admin | Published: August 15, 2016 01:24 AM2016-08-15T01:24:25+5:302016-08-15T01:24:50+5:30

एकास अटक : दोरीने गळा आवळला; एक महिला ताब्यात

Warangal's blood money dispute | वारांगनाचा खून पैशाच्या वादातून

वारांगनाचा खून पैशाच्या वादातून

Next

सांगली : येथील गोकुळनगरमधील रेश्मा मुगूटसाब सनदी (वय ३५) या वारांगनाच्या खुनाचा उलगडा करण्यात विश्रामबाग पोलिसांना रविवारी यश आले. पैशाच्या वादातून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संदीप मारुती कलगुटगी (२९, रा. वडर कॉलनी, सांगली) या संशयितास अटक करण्यात आली आहे. रेश्मासोबत राहणाऱ्या एका महिलेसही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
रेश्मा तीन मुलींसोबत गोकुळनगरमधील चौथ्या गल्लीत राहत होती. शुक्रवारी रात्री एक ग्राहक तोंडाला रूमाल बांधून रेश्माकडे आला होता. तीन मुली दुसऱ्या खोलीत जेवण करीत होत्या. संशयित ग्राहक बारा वाजता रेश्माच्या खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर मुली रेश्माला जेवण करायला बोलाविण्यास गेल्या असता, सुरुवातीला रेश्मा झोपलेल्या स्थितीत त्यांना दिसून आली होती. त्यांनी रेश्माला हाक मारली; पण काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे मुली घाबरून घराला बाहेरून कुलूप लावून जवळच्या झोपडीत राहायला गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मुलींनी रेश्माच्या बेळगाव येथील बहिणीशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. तिची बहीण आल्यानंतर रेश्माच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. रेश्माच्या नाकातून रक्तस्राव झालेला होता. डाव्या डोळ्याखाली काळसर जखम होती. गळ्यावर काळा व निळसर व्रण होता. डाव्या पायाच्या पोटरीवर हाताच्या नख्याने ओरबडलेले होते. तिचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.
पोलिसांनी रेश्मासोबत राहणाऱ्या मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडून संदीप कलगुटगीचे नाव पुढे आले. त्याला तातडीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने रेश्माचा खून केल्याची कबुली दिली. संदीप गेल्या सहा वर्षांपासून रेश्माच्या संपर्कात होता. तो नेहमी तिच्याकडे येत असे. रेश्माकडे पैशाची मागणी करायचा. तीही त्याला पैसे देत असे. रेश्माने एका संस्थेत एक लाख ४० हजारांची गुंतवणूक केली होती. ही रोकड तिला आठवड्यापूर्वी मिळाली होती. ती संदीपला हवी होती. पण रेश्माने पैसे देण्यास नकार दिला होता. यातून त्यांच्यात चार दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी रात्री तोंडाला रुमाल बांधून आलेला तो संशयित संदीपच होता. त्याने रेश्माकडे पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. हा वाद मुलीही ऐकत होत्या. त्यानंतर संदीपने लहान दोरीने रेश्माचा गळा आवळला. नाकावरही ठोसा मारला होता. मारहाणीत तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
संशयिताला कोठडी
अटकेत असलेल्या संदीपला रविवारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. सहाय्यक सरकारी वकील एस. एम. पखाली यांनी युक्तिवाद केला. संदीपचे रेश्मासोबत सहा वर्षांपासून संबंध होते. तो नेहमी तिच्याकडे पैशाची मागणी करायचा. यातूनच त्याने खून केल्याचे प्राथमिक कारण पुढे येत आहे. पण आणखी काय कारण आहे का? खुनात त्याच्यासह आणखी कुणाचा सहभाग आहे का? गळा आवळण्यासाठी त्याने कशाचा वापर केला, याचा उलगडा होणे गरजेचे असून, यासाठी त्याला पोलिस कोठडी द्यावी, अशी अ‍ॅड. पखाली यांनी मागणी केली. त्यावर न्यायालयाने संदीपला २० आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
रुमाल बांधला, पण आवाज तोच!
संदीप पहिल्यांदाच तोंडाला रुमाल बांधून रेश्माकडे आला होता. रेश्माचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशानेच तो आला होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. रूमाल बांधल्याने मुलींनीही त्यास ओळखले नव्हते. रेश्मासोबत तो आवाज वाढवून भांडत असताना, मुलींनी त्याचा आवाज ओळखून संदीपच असल्याचा अंदाज बांधला होता. रेश्मा मृत झाल्यानंतर तो बारा वाजता तोंडाला रूमाल बांधूनच खोलीतून बाहेर पडला.
महिलेकडे चौकशी : रेश्मासोबत राहणाऱ्या दोन मुली व एका महिलेस शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोन मुलींना रविवारी सकाळी सोडून दिले; पण एक महिला ताब्यात आहे. तिच्याकडे चौकशी केली जात आहे. तिचा खुनात सहभाग असण्याची शक्यता आहे. रेश्माच्या डाव्या पायाच्या पोटरीवर नखाने ओरबडलेली जखम कुणाची आहे? याचा तपास सुरू आहे.

Web Title: Warangal's blood money dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.