शहरातील नागरिकांवर वाॅर्ड समित्यांचा वाॅच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:33 AM2021-04-30T04:33:29+5:302021-04-30T04:33:29+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात गृह अलगीकरणातील रुग्णही घराबाहेर पडत आहेत. परजिल्ह्यांतूनही शहरात ...
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात गृह अलगीकरणातील रुग्णही घराबाहेर पडत आहेत. परजिल्ह्यांतूनही शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर वाॅच ठेवण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी वाॅर्ड समितीला दिले.
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आयुक्त कापडणीस यांनी वाॅर्ड समित्यांना अलर्ट केले आहे. वॉर्डातील नागरिक अनावश्यक कामांसाठी बाहेर जाणार नाहीत तसेच वॉर्डात येणार नाहीत याची दक्षता घ्या. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत नागरिकांची गर्दी होणार नाही, याबाबत उपाययोजना करा, अशा सूचना दिल्या आहेत.
वॉर्डात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना दैनंदिन भेटी द्या. रुग्ण होम आयसोलेशनच्या नियमांचे पालन करीत आहेत किंवा नाही याची खात्री करा. नियमांचे उल्लंघन करणार्या रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करा, असे निर्देश दिले आहेत. वॉर्डातील दूध, भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरविणार्या आस्थापनांची यादी फोन नंबरसह नागरिकांना माहितीसाठी प्रसिद्ध करावी.
वॉर्डात विनामास्क फिरणार्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. वॉर्डातील मंगल कार्यालयात गर्दीचे व कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्ष रहा. उल्लंघन केल्यास कारवाई करा. अत्यावश्यक सेवेतील दुकानांमध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा भंग करणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी. परगावाहून, परराज्यांतून आलेल्या नागरिकांची दिनांकनिहाय नोंदी ठेवा. ते चौदा दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहतील याची नियमित तपासणी करा. लसीकरण केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांच्या समन्वयाने प्रभागातील पात्र व्यक्तींचे लसीकरण करून घ्या. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याबाबत नियोजन करा. वॉर्डातील जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स यांचा होम आयसोलेशन रुग्ण तपासणी, लसीकरण कामात उपयोग करून घ्या, अशा सूचना दिल्या आहेत.