दिघंचीत दुभाजकाच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:28 AM2021-09-27T04:28:38+5:302021-09-27T04:28:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे राज्यमार्गाचे काम पूर्णत्वास आले असताना काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक रास्ता दुभाजक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे राज्यमार्गाचे काम पूर्णत्वास आले असताना काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक रास्ता दुभाजक व सर्कलचे काम होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळे आटपाडी रस्त्यावरील रस्ता दुभाजकाचे काम बंद आहे. ते काम तत्काळ सुरू करावे, अन्यथा पाच सप्टेंबरपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारपेठ असणारे दिघंची शहर सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या हद्दीवर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. पंढरपूर-मायणीपर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु गावाच्या शोभेत भर पडत असल्याचे निदर्शनात येताच काही स्वयंघोषित नेत्यांनी आकसापोटी आटपाडी रस्त्याला जाणाऱ्या दुभाजकाचे काम बंद पाडले आहे. दुभाजक झाले नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्ता दुभाजकावर सर्कलच्या कामास अडथळा देऊन काम प्रलंबित ठेवणाऱ्या स्वयंघोषित पुढाऱ्यांवर कारवाई करावी व तत्काळ प्रलंबित रस्ता दुभाजकाचे काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.