शेत जमीन काढून घेतल्याबद्दल आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:24 AM2021-03-22T04:24:34+5:302021-03-22T04:24:34+5:30
आष्टा : तुंग (ता. मिरज) येथील वारणा प्रकल्पग्रस्त पांडुरंग कोंडीबा गायकवाड यांची शेत जमीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी ...
आष्टा : तुंग (ता. मिरज) येथील वारणा प्रकल्पग्रस्त पांडुरंग कोंडीबा गायकवाड यांची शेत जमीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी काढून घेतल्याबद्दल त्यांनी मंगळवार दि. २४ रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
पांडुरंग गायकवाड यांचे पुनर्वसन करून कारंदवाडी येथे २ एकर क्षेत्र देणे असताना ७३ गुंठे क्षेत्र देण्यात आले. मात्र शासनाच्या चुकीमुळे त्यांच्या नावावर १ हेक्टर १३ आर शेतजमीन संकलन रजिस्टर वरती लावली गेली होती. या प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या बाबत संबंधित अधिकारी यांनी कॅम्प घेऊन समस्या सोडवल्या मात्र यावेळी पांडुरंग गायकवाड यांच्या नावे १ हेक्टर १३ आर शेतजमीन लागली गेली होती. प्रत्यक्षात त्यांना ७ आर देणे असताना ३२ आर चुकीच्या पद्धतीने काढून घेण्यात आले व त्यातील जमीन दुसऱ्या प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आली. पांडुरंग गायकवाड यांनी याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यासह पालकमंत्री जयंत पाटील व आष्टा पोलीस ठाणे या ठिकाणी तक्रार दिली असून न्याय न मिळाल्यास बुधवार दि. २४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतमजूर कष्टकरी परिषदेचे उपाध्यक्ष गौरव नायकवडी यांनीही या प्रकरणी शासनाने प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची मागणी केली आहे.