जलपुरुषाच्या कार्यक्रमाची जंगी तयारी
By Admin | Published: October 28, 2015 11:30 PM2015-10-28T23:30:26+5:302015-10-29T00:15:24+5:30
जलपरिक्रमासाठी अर्जुना नदीची निवड
राजापूर : डिसेंबर महिन्यात राजापूर दौऱ्यावर येणारे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे - पालवे यांच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असून, त्यावेळी अर्जुना नदी परिक्रमा व ग्रामस्थ मेळावा पार पडणार आहे.
कोकणात दरवर्षी तुफान पाऊस पडूनदेखील उन्हाळी दिवसात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याबाबत कोकण भूमी प्रतिष्ठानच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून, कोकणातील नद्या बारमाही सजीव राहतील व त्याचा फायदा सर्वांना होईल या हेतूने जलपुरुष व मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या सहकार्यातून व जनतेच्या सहभागातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी व राजापूर तालुक्यातील अर्जुना या नद्यांना सर्वप्रथम समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या नद्यांच्या परिक्रमेसाठी स्वत: डॉ. राजेंद्र सिंह हे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत कोकणात येत आहेत. १ डिसेंबरला त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, ४ डिसेंबरला ते राजापुरात येतील. त्यांच्यासमवेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे - पालवे, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ४ डिसेंबरला ओणीमध्ये मेळावा पार पडल्यानंतर राजापुरात गणेश विसर्जन घाटावर पूजन होईल असा नियोजित कार्यक्रम आहे. त्याची जय्यत तयारी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात संपूर्ण अर्जुना नदीची परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जेथे अर्जुना नदीचा उगम होतो त्या स्थानापासून समुद्र संगमापर्यंत उभय काठावरील गावातील ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत.
अर्जुना नदीच्या उगमापासून उत्तरेला करक, पाचल पेठवाडी, येळवण, खडीकोळवण, सौंदळ, चिखलगाव, गोठणे दोनिवडे, शीळ, राजापूर, धुतपापेश्वर, गोळव, शिवणे, सोगमवाडी, सोड्येवाडी, राऊतवाडी, बुरंबेवाडी, धाऊलवल्ली, नाटे, साखरीनाटे तर दक्षिणेला करक, तळवडे, पाचल, रायपाटण, बागवेवाडी, परटवली, आडवली, फुफेरे, आंगले, शेंबवणे, दोनिवडे, उन्हाळे, राजापूर, कोंडेतड, कणेरी, शेढे, डोंगर, विलये, पडवे, मिरगुलेवाडी, चव्हाणवाडी, दळे, आगरवाडी, जैतापूर व जुवे जैतापूर अशी गावे येत आहेत. (प्रतिनिधी)
1जलपरिक्रमासाठी अर्जुना नदीची निवड
नद्यांना लोकसहभागातून बारमाही प्रवाह कसा राहिल यासहित नदीकाठच्या गावातील किनाऱ्यांवर आधुनिक शेती व त्यातून समृद्धी करणे, नद्यांवर छोटी धरणे बांधणे, नद्यांचा डोह खोल करणे अशी कामे भविष्यात केली जाणार आहेत व त्यासाठीच अर्जुना नदीची निवड करण्यात आली आहे.
2दरवर्षी तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसते. या गावांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.