अरे बाप रे....मगरीच्या जवळच पोहत होता, सुदैवाने बचावला; सांगलीतील घटना -video
By अविनाश कोळी | Published: September 13, 2023 02:32 PM2023-09-13T14:32:46+5:302023-09-13T15:40:39+5:30
नदीकाठावरील लोकांचा आरडाओरडा
सांगली : तल्लीन होऊन तो पोहत होता...दुसऱ्या बाजुने मगर त्याच्या दिशेने येत होती...नदीकाठावरील लोकांनी हे दृश्य पाहताच डोक्याला हात लावला. आरडाओरड सुरु झाली, पण पोहणाऱ्याच्या कानावर त्यांचा आवाज पोहचला नाही. पोहत तो मगरीजवळ गेला अन् साऱ्यांचा श्वास थांबला. मगर त्याला गिळणार की काय, असा विचार लोक करीत असतानाच मगर पाण्यात खोल गेली अन् तिच्यावरुन तो पुढे पोहत सुखरुप काठावर आला.
सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठावर घडलेल्या या घटनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कृष्णा नदीत मगरींची संख्या कमालीची वाढली आहे. तरीही पोहणाऱ्यांनी, धुणे धुणाऱ्यांनी नदी सोडली नाही. त्यामुळे अनेकदा मगरीकडून लोकांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडल्या. बुधवारी सकाळी सांगलीतील जलतरणपटू शरद राजदीप याच्यावर असेच मगरीचे संकट आले, पण नियतीने त्याला वाचविले. मगरीच्या अगदी तोंडासमोर पोहत जाऊन सुद्धा शरद राजदीप सुखरूपपणे बचावले. या घटनेचा नदीकाठावरील नागरिकांनी केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सांगलीत कृष्णा नदीमध्ये असंख्य लोक दररोज सकाळी पोहायला उतरत असतात. जलतरणपटू शरद राजदीप हे सुद्धा रोज कृष्णा नदीतून पोहण्याचा सराव करतात. सांगलीच्या बायपास रस्त्यावरील नवा पूल ते बंधारा या भागात अजस्त्र मगरींचा नेहमीच वावर असतो. दररोज एक मगर त्या मार्गाने पाण्यातून फिरताना लोकांना दिसत असते. बुधवारी सकाळी शरद राजदीप हे कृष्णा नदीत सांगलीवाडीकडील बाजूने त्याच मार्गाने पोहण्याचा सराव करत होते. माई घाटाच्या जवळ शरद राजदीप पोहत येत असताना नेमक्या त्यांच्या विरुद्ध बाजूने एक अजस्त्र मगर येत असल्याचे लोकांनी पाहिले. त्यामुळे राजदीप यांना सावध करून मार्ग बदलण्यासाठी लोक जोरजोराने आरडाओरडा करू लागले.
लोक इतके ओरडत होते की कोणीही सहज तो आवाज ऐकूनच गडबडले असते. मात्र कानात एअर प्लग घातलेला असल्याने आणि पाण्यात मान खाली घालून पोहण्याचा शरद राजदीप यांचा सराव असल्याने लोकांचा आवाज त्यांच्या कानावर पोहोचलाच नाही किंवा आपल्यासमोर अगदी जवळ अजस्त्र मगर येत आहे याचा त्यांना पत्ताही लागला नाही. आपल्याच सरावात तल्लीन होत ते मगरीच्या जवळ जवळ जात राहिले. शेवटी त्यांच्या जवळ येताच मगर पाण्यात खाली गेली. त्यावरुन राजदीप पोहत निघून गेले आणि लाेकांनी सुटकेचा श्वास सोडला.
अरे बाप रे....मगरीच्या जवळच पोहत होता, सुदैवाने बचावला#Sanglipic.twitter.com/Lts8f4AbN8
— Lokmat (@lokmat) September 13, 2023