तासगावात आबांचा काकांना धोबीपछाड
By admin | Published: July 17, 2014 12:28 AM2014-07-17T00:28:02+5:302014-07-17T00:28:39+5:30
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे संजय पवार : उपनगराध्यक्षपद आबा गटाकडे
तासगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व अत्यंत चुरशीच्या बनलेल्या तासगाव नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षपदाच्या लढतीत आज, बुधवारी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी खा. संजयकाका पाटील यांना धोबीपछाड दिला. आबांच्या खेळीने काँग्रेसचे संजय पवार आणि राष्ट्रवादीचे सुरेश थोरात केवळ एका मताने अनुक्रमे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष झाले. या दोघांना १९ पैकी प्रत्येकी १०, तर संजयकाका गटाच्या बाबासाहेब पाटील आणि अनिल कुत्ते यांना प्रत्येकी नऊ मते मिळाली. या निवडणुकीतून गृहमंत्री पाटील यांनी नगरपालिकेवरील पकड दाखवून दिली.
तासगाव पालिकेत गृहमंत्री पाटील व खा. संजयकाका पाटील यांच्या गटांचे प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व १८ सदस्य राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पालिकेत काँग्रेसचा एकमेव सदस्य आहे. वर्षभरापासून गृहमंत्री पाटील आणि खा. संजयकाका गटात धुसफूस सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून तर दोन्ही गट एकमेकाविरोधात उभे ठाकले आहेत. संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपची उमेदवारी मिळवली आणि ते खासदारही झाले. तेव्हापासून या दोन गटांतील संघर्ष टोकदार बनला आहे. तो नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उफाळून आला. मात्र, पालिकेत दोन्ही गटांचे संख्याबळ बरोबरीचे असल्याने काँग्रेसच्या एकमेव सदस्याला आपल्याकडे वळवून त्यालाच नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याची खेळी गृहमंत्री पाटील यांनी खेळली. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या गटाच्या दोघांनी अर्ज मागे घेतल्यानंतर ही खेळी स्पष्ट झाली होती.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून शहरात तणाव होता. नगरपालिका परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दुपारी एक वाजता निवडीची विशेष सभा पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी मनोज देसाई उपस्थित होते. नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पहिल्यांदा पार पडली. त्यात सुरुवातीला खा. संजयकाका गटाचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांच्या बाजूने नऊ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. त्यानंतर संजय पवार यांच्या बाजूने १० सदस्यांनी (पान १ वरून)
हात उंचावून मतदान केल्याने ते केवळ एका मताने विजयी झाले. उपनगराध्यक्षपदासाठी गृहमंत्री पाटील गटातून सुरेश थोरात यांना १०, तर खा. संजयकाका गटाच्या अनिल कुत्ते यांना नऊ मते मिळाली. सभेपूर्वी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता.
... आणि हालचाली गतिमान झाल्या
दुपारी बारापर्यंत पालिकेत कोणताच नगरसेवक हजर नव्हता. सव्वाबारानंतर खा. संजयकाका गटाचे सदस्य, तर साडेबाराच्या दरम्यान गृहमंत्री पाटील गटाचे सदस्य एकाचवेळी पालिकेत आले. बारापर्यंत शांत असलेल्या पालिकेत एकदमच हालचाली गतिमान झाल्या. पाऊणच्या दरम्यान तहसीलदार राजेंद्र शेळके आले व प्रक्रियेस सुरुवात झाली.
चुरस वाढण्याचे कारण काय?
नगरसेविका जयश्री धाबुगडे या गृहमंत्री आर. आर. पाटील गटातून निवडून आल्या आहेत, मात्र लोकसभा निवडणुकीपासून त्या खा. संजयकाका गटात सामील झाल्या आहेत. त्यामुळे गृहमंत्री पाटील गटाकडे असणारे १० सदस्यांचे संख्याबळ नऊवर आले आहे, तर संजयकाका गटाचे संख्याबळही नऊ झाले आहे. त्यामुळेच पालिकेत सत्ता स्पर्धेतील चुरस वाढली आहे. धाबुगडे यांनी आज खा. संजयकाका गटालाच मतदान केले.
मोठा पोलीस बंदोबस्त
आज सकाळपासूनच पालिकेच्या रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजंूनी बंद केली होती. दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राखीव पोलीस दलाची तुकडीही हजर होती. सकाळी मुख्य रस्त्यावरून पोलिसांचे संचलनही झाले होते. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटस्बाहेर नागरिकांनी गर्दी केली होती.
१९ सदस्यसंख्या असलेल्या पालिकेत १० मते मिळविणाऱ्याच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार हे स्पष्ट होते. गृहमंत्री पाटील गटाने कॉँग्रेसच्या संजय पवार यांना पाठिंबा दिला. त्यामुळे पालिकेत एकच सदस्य असलेल्या कॉँग्रेसला थेट नगराध्यक्षपदाची संधी मिळाली!