महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजांची धुलाई : सांगलीत गस्त वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:32 PM2018-10-06T23:32:20+5:302018-10-06T23:35:05+5:30

गुंड सनी कांबळे याच्या खुनानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभाग आक्रमक झाल्याचे शनिवारी दिसून आले. शहरातील महाविद्यालय परिसरात ग्रुप करुन थांबून हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोर तरुणांची एलसीबीच्या पथकाने चांगलीच धुलाई केली.

Washing booths in college premises: Sangli patrol | महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजांची धुलाई : सांगलीत गस्त वाढविली

महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजांची धुलाई : सांगलीत गस्त वाढविली

Next
ठळक मुद्दे सनी कांबळेच्या खुनानंतर ‘एलसीबी’ आक्रमकएलसीबीची कारवाई होत असताना विश्रामबाग पोलीस मात्र निवांत होते

सांगली : गुंड सनी कांबळे याच्या खुनानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभाग आक्रमक झाल्याचे शनिवारी दिसून आले. शहरातील महाविद्यालय परिसरात ग्रुप करुन थांबून हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोर तरुणांची एलसीबीच्या पथकाने चांगलीच धुलाई केली. अनेक तरुण दुचाकी तिथेच सोडून गल्ली-बोळाचा आधार घेऊन पळून गेले. महाविद्यालय परिसरात दिवसभर साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू होती.

कॉलेज कॉर्नरवरील हॉटेल अक्षरम ते दुर्गामाता मंदिराच्या पिछाडीस रस्त्यावर पाच दिवसांपूर्वी गुंड सनी कांबळे याचा भरदिवसा खून करण्यात आला होता. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सनीवर पहिला हल्ला करणारा संशयित हा अल्पवयीन आहे. तो कॉलेज कॉर्नरवरील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. त्याची प्रचंड दहशत होती. अनेक तरुण ग्रु्प स्थापन करुन महाविद्यालय परिसरात दहशत माजवित असल्याच्या तक्रारी सनीच्या खुनानंतर आल्या. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी या ग्रुपमधील सदस्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.

पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने शनिवारी सकाळी श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, चंपाबेन शाह महाविद्यालय, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय पसिरात गस्त घातली. संपूर्ण महाविद्यालय परिसराची पाहणी केली. कस्तुरबाई वालचंद व चंपाबेन शाह महाविद्यालय आवारात अनेक तरुण टोळके करुन हुल्लडबाजी करताना आढळून आले. पथकाने हातात काठ्या घेऊन या तरुणांची धरपकड केली. त्यांना पकडून धुलाई केली. हे तरुण महाविद्यालयात शिक्षणही घेत नाहीत.तरीही ते येऊन थांबतात.पथकाने त्यांची नावे रेकॉर्डवर घेतली आहेत. पुन्हा महाविद्यालय परिसरात दिसल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला.

पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे कॉलेज कॉर्नर परिसरात सन्नाटा पसरला. चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या आवारतही पोलिसांनी हुल्लडबाजांचे चोपकाम केले. पोलिसांनी दिसेल त्या तरुणास पकडण्यास सुरुवात केल्यानंतर काही तरुणांनी त्यांच्या दुचाकी तिथे सोडून पलायन केले. काही तरुणांना पाठलाग करुन पकडले. पुन्हा महाविद्यालयाच्या आवारात दिसल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पळून गेलेल्यांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या. त्या घेऊन जाण्यासाठी दुपारी तरुणांंंना एलसीबीची पायरी चढावी लागली. पोलिसांनी संबंधित तरुणांना ताकीद देऊन दुचाकी ताब्यात दिली. एलसीबीची कारवाई होत असताना विश्रामबाग पोलीस मात्र निवांत होते.

सोमवारपासून पुन्हा कारवाई
पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे म्हणाले, महाविद्यालय आवारात ग्रुप स्थापन करून काही तरुण दादागिरी करीत आहेत. तब्बल ३५ ग्रुप असल्याची माहिती मिळाली आहे. या ग्रुपमधील तरुणांचा महाविद्यालयाशी काहीही संबंध नाही. तरीही ते दुचाकी घेऊन तिथे जातात. टोळके करून हुल्लडबाजी करतात. यासाठी त्यांच्यावर कारवाई सुरू ठेवली आहे. सोमवारपासून ही कारवाई आणखी तीव्र केली जाईल.

Web Title: Washing booths in college premises: Sangli patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.