कुपवाड एमआयडीसीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:42+5:302021-04-13T04:25:42+5:30
महापालिकेमध्ये स्वच्छ भारत अभियनांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र महापालिकाच रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकत असल्याची गंभीर बाब ...
महापालिकेमध्ये स्वच्छ भारत अभियनांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र महापालिकाच रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकत असल्याची गंभीर बाब कुपवाडमध्ये निदर्शनास येत आहे. एमआयडीसीलागत असणाऱ्या स्मशानभूमीजवळ कचऱ्याचे ढीग पसरलेले आहेत. मेलेली जनावरे आणून टाकण्याचे प्रकार घडत आहेत. कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. एमआयडीसीतील कामगार येथून ये-जा करत असतात. रात्रीच्यावेळी कचऱ्याभोवती आश्रय घेतलेली मोकाट कुत्री कामगारांच्या वाहनाच्या, सायकलीच्या मागे धाऊन जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत.
याबरोबरच रविवारी अज्ञाताने कचरा जळल्यामुळे धुराचे लोट निर्माण झाले होते. या आगीत कुत्र्यांची तीन लहान पिले दगावली. दोन पिलांना प्राणी मित्रांनी कसेबसे वाचवले. एखादी ठिणगी जर शेजारीच असलेल्या कारखान्यात पडली असती, तर होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण?, असा प्रश्न उद्योजक अनंत चिमड यांनी उपस्थित केला आहे. या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.