जत तालुक्यात पावसाची दडी - खरीप हंगाम वाया : जनावरांच्या चाऱ्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 09:14 PM2018-08-21T21:14:55+5:302018-08-21T21:15:40+5:30
पावसाने दडी मारल्याने जत तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकºयांना यंदा पुन्हा दुष्काळास सामोरे जावे लागणार आहे.
गजानन पाटील
संख : पावसाने दडी मारल्याने जत तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शेतकºयांना यंदा पुन्हा दुष्काळास सामोरे जावे लागणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी, जनावरांच्या चाºयासाठी भटकंती करावी लागते की काय? या चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे. खरिपातील पिके वाया गेल्यामुळे मजुरांवर उपासमारीचे संकट आले आहे.
ऐन पावसाळ्यात फक्त जोराचा वारा वाहू लागल्यामुळे जमा झालेले ढग वाºयाने गायब होत आहेत. गेल्यावर्षी पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिके चांगली आली होती. यंदा आतापर्यंतची सर्व नक्षत्रे कोरडी गेली आहेत. खरीप हंगामात पेरलेली पिके कोमेजली आहेत. खरीप हंगामातील बाजरी हे प्रमुख पीक आहे. या हंगामात सूर्यफुल, मका, तूर, हुलगा, मटकी, मूग, भुईमूग, उडीद या पिकांची पेरणी केली जाते.
खरीप हंगामामध्ये एकूण क्षेत्र ६२ हजार २०० हेक्टर आहे. त्यामध्ये बाजरी ३७ हजार हेक्टर, मका १ हजार ३५०, तृणधान्ये ३९ हजार १०० हेक्टर, इतर कडधान्यांचे १६ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये मूग १९८० हेक्टर, उडीद १००० हेक्टर, भुईमूग २ हजार २०० हेक्टर, सूर्यफूल २१५८० हेक्टर, सोयाबीन २००० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात.
यावर्षी सुरुवातीपासून पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्यानंतरही शेतकºयांनी खरिपाची पेरणी मोठ्या जोमाने केली आहे. तालुक्यात यंदा ४५ हजार ९८१ हेक्टर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित होते; पण त्यापेक्षा जास्त म्हणजे ५० हजार ४५३ हेक्टर पेरणी झाली आहे. शेतकºयांनी मोठ्या आशेने पेरणी केली, पण त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
गवताची उगवण नाही : पशुधन संकटात
पावसाने हुलकावणी दिल्याने रानात, डोंगरात, बांधावर खुरट्या गवताची उगवण झालेली नाही. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हैशी ही दुभती जनावरे संकटात सापडली आहेत.द्राक्षे, डाळिंबाला फटका द्राक्षबागांच्या छाटण्या घेण्याचा कालावधी जवळ आला आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छाटण्या होतात. परंतु अजूनपर्यंत पाऊसच झाला नसल्याने द्राक्ष छाटण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. तसेच डाळिंब बागांचा भर धरण्याचा कालावधी आहे. पण पावसाळा संपत आला तरी सुद्धा विहिरी, कूपनलिका, तलावांना पाणीच आले नाही. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब, फळबागा दुष्काळाच्या संकटात सापडल्या आहेत.
ओढे, तलाव कोरडेच
जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला नाही. तलाव, ओढ्यांना पाणी आले नाही. भूमिगत पाण्याची पातळी कमी झाली आहे. तालुक्यातील ११ तलावांतील पाणीसाठा मृतसंचय पातळीखाली आहे. १ तलाव कोरडा पडला आहे. पाणीसाठा ९४२.८६ दशलक्ष घनमीटर आहे. टक्केवारी फक्त १३ टक्के इतकी आहे. माडग्याळ, व्हसपेठ, कुणीकोणूर, लमाणतांडा (दरीबडची), गिरगाव या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तेथे टॅँकरची मागणी केली आहे.
९८ मि.मी. पावसाची नोंद
तालुक्यामध्ये वार्षिक पर्जन्यमान ४५७.७० मि.मी. आहे. मागील तीन महिन्यात तालुक्यात ९८.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यमानाची टक्केवारी ३५.८६ आहे. तालुक्यात मेमध्ये २.५० मि.मी., जूनमध्ये ८२.६३ मि.मी., जुलै महिन्यात १२.१३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पेरणी अहवाल (हेक्टरमध्ये)
पीक क्षेत्र
बाजरी १९४०१
मका ९२२१
तूर ५०३२
मूग २६६५
उडीद ७९४९
मटकी ३३३२
हुलगा ५७७
अन्य पिके २२७६
तालुक्यातील तलाव, मध्यम प्रकल्प पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)
प्रकल्प संख्या पाणीसाठा टक्केवारी कोरडे
२८ ९४२.८६ १३ टक्के १
- जून ते आजअखेरचा पाऊस (मिलिमीटर)
२०१८ २०१७
९८.८ १४७.७