जिल्ह्यात निवडणुकीवर १६५ पथकांचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 03:22 PM2019-09-25T15:22:34+5:302019-09-25T15:25:10+5:30
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
शरद जाधव
सांगली : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
त्यानुसार निवडणूक कालावधित संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओ पथक, स्थिर पथक व भरारी पथक अशा पथकांची स्थापना करण्यात आली असून, आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. एकूण निवडणूक प्रक्रियेवर १६५ पथकांचा ह्यवॉचह्ण राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे होण्यासाठीचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात पथकाच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
आचारसंहिता लागू होताच सार्वजनिक ठिकाणचे फलक हटविण्याबरोबरच शासकीय इमारतींचा वापर व इतर घडामोडींच्या पाहणीसाठी भरारी पथक कार्यरत झाले आहे. त्याचबरोबर अवैध मद्यविक्री अथवा रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालू राहत असल्यास त्यावरही कारवाईसाठी भरारी पथक कार्यरत आहे.
निवडणुकीची अधिसूचना दि. २७ रोजी जारी झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओ व्हिविंग टीम, व्हिडीओ सर्व्हेलन्स टीम व स्थिर पथक कार्यरत होणार आहे. यात उमेदवारांच्या प्रचारसभा, दौरे व इतर घडामोडीवर पथकाची बारीक नजर असणार आहे.
प्रशासनाने व्हिडीओ व्हिविंगची १८ पथके, स्थिर पथके ४९, व्हिडीओ सर्व्हेलन्सची ४३, तर ५५ भरारी पथकांची स्थापना केली आहे. अशा एकूण १६५ पथकांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.