रेकॉर्डवरील बनावट दारू तस्करांवर ‘वॉच’ : प्रकाश गोसावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 11:40 PM2015-12-29T23:40:56+5:302015-12-30T00:31:35+5:30

स्वस्तात मस्त दारू पिण्याच्या नादात अनेकांचा बळीही जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोणती काळजी घेतली आहे,

'Watch' on fake liquor smugglers on record: Prakash Gosavi | रेकॉर्डवरील बनावट दारू तस्करांवर ‘वॉच’ : प्रकाश गोसावी

रेकॉर्डवरील बनावट दारू तस्करांवर ‘वॉच’ : प्रकाश गोसावी

Next

सहा महिन्यांपूर्वी पेठ (ता. वाळवा) येथे बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी कोरोची (ता. हातकणंगले) येथेही बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वतंत्रपणे ही कारवाई केल्याने, जिल्ह्यात बनावट दारुची तस्करी होते, हे यावरुन स्पष्ट झाले आहे. ‘थर्टी फर्स्ट’ उद्याच असल्याने, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बनावट दारूची तस्करी होऊ शकते. स्वस्तात मस्त दारू पिण्याच्या नादात अनेकांचा बळीही जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोणती काळजी घेतली आहे, त्यांच्या काय कारवाया सुरू आहेत, याविषयी अधीक्षक प्रकाश गोसावी यांच्याशी साधलेला थेट संवाद...

बनावट दारू रोखण्यासाठी कोणती काळजी घेतली आहे?
- मुळातच जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या बनावट दारूची तस्करी होत नाही. हातभट्टीशिवाय येथे अनधिकृत दारूचे उत्पादन होत आहे. हातभट्टीची दारु पिऊन बाहेरील जिल्ह्यात अनेकांचे बळी गेले आहेत. सांगली जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी हातभट्टी दारू अड्ड्यांचा शोध घेऊन ते उद्ध्वस्त करण्याचे काम सुरु आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर १८ डिसेंबरपासून जिल्ह्यात बनावट दारुची तसेच हातभट्टीची तस्करी होऊ नये, यासाठी तपासणी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत पाच स्वतंत्र पथके सहभागी झाली आहेत. पोलिसांच्या मदतीने ढाबे व संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. स्पिरीटच्या टँकरचीही तपासणी सुरु ठेवली आहे. आतापर्यंतच्या तपासणीत कुठेही बनावट दारु आढळलेली नाही.
गोवा, कर्नाटकातील दारूचे काय?
- गोवा आणि कर्नाटक राज्यातून महसूल चुकवून दारुची तस्करी होण्याची शक्यता आहे. कोणताही परवाना नसताना या दोन राज्यांतील दारुची येथे तस्करी झाल्यास आम्ही त्याला बनावट दारूच समजणार आहोत. गोवा आणि कर्नाटकातून येणाऱ्या रेल्वे व एसटी बसेसची मिरजेत तपासणी केली जात आहे. यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. प्रवाशांच्या साहित्याची तपासणी केली जात आहे.
बनावट दारू तस्कर कोठे आहेत?
- जिल्ह्यात यापूर्वी बनावट दारूचे कारखाने सुरू असल्याचे उघडकीस आले होते. पण या कारखान्यात तयार झालेली दारू लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच कारवाई झाली आहे. पण दारू तयार करणारे आठ तस्कर आजही आमच्या रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगार आहेत. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सध्या तरी ते या व्यवसायात नसल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याकडून बनावट दारूबाबत काही माहिती मिळते का? याची चाचपणी सुरू आहे.
तपासणी नेमकी काय सुरू आहे?
- ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहिमेत वाढ केली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या, रजा बंद केल्या आहेत. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर ‘चेक नाके’ उघडले आहेत. संशयित वाहनांची २४ तास तपासणी केली जात आहे. विशेषत: कर्नाटकातून येणारी वाहने तपासली जात आहेत. ‘हुबळीमेड’ दारूची तस्करी होत असल्याची अनेकदा चर्चा होती. पण आजपर्यंतच्या तपासणीत एकदाही ही दारूसापडली नाही. उलट कर्नाटकात देशी दारू तयार होत नसल्याचे आपल्या जिल्ह्यातील दारू तिथे नेली जाते.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- नागरिकांनी स्वस्त दारू मिळते म्हणून खरेदी करू नये. स्थानिक दुकानात जाऊनच दारू खरेदी करावी. स्वस्तात मस्त म्हणून दारूकडे पावले वळली, तर ते जीवावर बेतू शकते. विषारी दारूमुळे सहा महिन्यांपूर्वी मुंबईत अनेकांचा बळी गेल्याची घटना ताजी आहे. कोणी स्वस्तात दारू विकत असेल तरी त्याची माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. गरज पडल्यास पोलिसांची मदत घेऊन पुढील कारवाई करण्यावर भर दिला जाईल.
‘थर्टीफर्स्ट’चे नियोजन कसे आहे?
‘थर्टीफर्स्ट’ला पहाटे पाच वाजेपर्यंत देशी दारू दुकाने व परमिट रूम बियरबार उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एक दिवसाचे दारू पिण्याचे परवाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये देशी दारूसाठी दोन, तर विदेशी दारू पिण्यासाठी पाच रुपयाचा परवाना ग्राहकांना देणे बंधनकारक केले आहे. एक दिवसाच्या ‘पार्टी’ परवान्यासाठी सोळा हजार रुपये शुल्क आहे. अद्यापपर्यंत पार्टी परवान्यासाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे चोरून पार्टी करणाऱ्यांवर ‘वॉच’ राहील. अशी कुठे पार्टी आढळून आल्यास पोलिसांच्या मदतीने संबंधित पार्टी करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली जाईल.

Web Title: 'Watch' on fake liquor smugglers on record: Prakash Gosavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.