‘मातोश्री’वरून जिल्ह्यातील पक्षीय घडामोडींवर ‘वाॅच’; उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्याची दारेही खुली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 05:14 PM2022-07-20T17:14:17+5:302022-07-20T17:16:13+5:30
पक्षातील जुन्या व नव्या शिवसैनिकांना एकत्रित करून पक्षबांधणी मजबूत करण्याचा आराखडा आखला जात आहे.
अविनाश कोळी
सांगली : शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून जिल्ह्यातील एकमेव आमदार व जिल्हाप्रमुख आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने शिवसेनेचे वरिष्ठ नेते सतर्क झाले आहेत. जिल्ह्यातील घडामोडींवर थेट ‘मातोश्री’वरून ‘वॉच’ ठेवला जात आहे. पक्षात असूनही सक्रिय नसलेल्या जुन्या शिवसैनिकांनाही प्रवाहात आणून कार्यरत करण्याचे काम सुरू झाले आहे.
खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी त्यांच्या गटासह एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठाेपाठ जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनीही ठाकरे गटाला रामराम केला. उर्वरित पदाधिकारी व शिवसैनिक एकसंध रहावेत म्हणून आता प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ‘मातोश्री’वरून लक्ष ठेवले जात आहे. कुणी नाराज नाही ना, याबाबत आढावा घेतला जात आहे. नाराज असलेल्या किंवा अनेक वर्षांपासून सक्रिय नसलेल्या लोकांशीही संपर्क साधला जात आहे. जिल्ह्यात आता अधिक नुकसान होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.
खानापूर तालुक्यात बाबर यांच्या माध्यमातून शिवसेनेला मोठा धक्का बसल्याने या भागात नव्याने पक्षाची बांधणी करण्याबाबत मुंबईत जिल्हाप्रमुख संजय विभुते व अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. इस्लामपुरातील पक्षबांधणीबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. सांगलीतील पदाधिकाऱ्यांच्या गेल्या पंधरा दिवसांत मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याची दारेही आता खुली आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अजितराव घोरपडे मात्र ठाकरे गटातच
कवठेमहांकाळचे शिवसेना नेते अजितराव घोरपडे यांच्या भूमिकेकडेही जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. मात्र ते ठाकरे गटासोबतच असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिली.
जुन्या-नव्यांचे समीकरण
पक्षातील जुन्या व नव्या शिवसैनिकांना एकत्रित करून पक्षबांधणी मजबूत करण्याचा आराखडा आखला जात आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.
ठाकरेंसोबत बैठक
येत्या आठवडाभरात सांगलीतील प्रमुख पदाधिकारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी पक्षबांधणीबाबत करण्यात आलेल्या आराखड्यावर चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.