जिल्ह्यात महिलांच्या छेडछाडीवर आता निर्भयाचा ‘वॉच’
By Admin | Published: August 4, 2016 12:30 AM2016-08-04T00:30:22+5:302016-08-04T01:27:53+5:30
बावीस पथके नियुक्त : नियोजित मोहिमेअंतर्गत साडेपाचशे ठिकाणी पथकाचे लक्ष; पीडित मुलींची नावे गुप्त ठेवण्यात येणार
सांगली : जिल्ह्यात महिला, महाविद्यालयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी सांगली पोलिस दलाने हैदराबादच्या धर्तीवर निर्भया पथकाची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील ५५० छेडछाडीच्या ठिकाणांची (हॉट स्पॉट) निश्चिती करण्यात आली असून, या ठिकाणांवर २२ पथकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. अत्यंत गुप्तरित्या ही मोहीम राबविली जाणार आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी बुधवारी या उपक्रमाचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. तत्पूर्वी पोलिस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये निर्भया पथकाची प्रशिक्षण व कार्यशाळा पार पडली.
हैदराबाद येथील सायबराबाद जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात निर्भया पथकाचा उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे. नांगरे-पाटील यांनी पदभार हाती घेताच, हा उपक्रम कोल्हापूर परिक्षेत्रातही राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच जिल्ह्यातील प्रमुख महिला पोलिस अधिकाऱ्यांना हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी पाठविले. आता प्रत्यक्षात निर्भया पथकाची स्थापना होऊन कामकाजाला सुरुवात झाली.
महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी निर्भया पथक काम करणार आहे. महिलांची छेडछाड होणाऱ्या प्रमुख ठिकाणांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. त्यात महाविद्यालये, मुलींची वसतिगृहे, बाजार अशा जागांचा समावेश आहे. एकूण २२ पथके तयार केली असून, त्यांना चारचाकी व दुचाकी वाहने दिली आहेत. प्रत्येक वाहनात एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दर तीन महिन्यानंतर या पथकात बदल करण्यात येईल.
पोलिसांनी निश्चित केलेल्या हॉट स्पॉटवर पथकातील पोलिस कर्मचारी साध्या वेशात तैनात असतील. महिलांची छेड, मुलींचा पाठलाग करणे यावर त्यांचा वॉच राहणार आहे. पीडित मुलींचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. छेड काढणाऱ्या टोळ्यांना प्रतिबंध करण्यात येईल. सोशल मीडियावरूनही महिलांना संदेश पाठवून त्रास देणाऱ्यांचाही बंदोबस्त होणार आहे. सुरुवातीला छेड काढणारे, त्रास देणाऱ्याचे समुपदेशन करण्यात येईल. तेही त्याच्या पालकांसमोरच होईल. त्रास देणारा विवाहित असेल तर पत्नीसमोरच पोलिस ठाण्यात त्याचे समुपदेशन होईल. त्याशिवाय महिलांना तक्रार करण्यासाठी नियंत्रण कक्षातील १०० क्रमांक व महिला पथकाकडील १०९१ या क्रमांकावर संपर्क साधण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अक्षयकुमार ब्रॅन्ड अम्बॅसिडर
निर्भया पथकाचा उपक्रम सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. येत्या सोमवारी कोल्हापुरात पथकाचे अनावरण केले जाणार आहे, तर पुढील आठवड्याभरात सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यात पथक कार्यान्वित होईल. या पथकाचे औपचारिक उद्घाटन सिनेअभिनेता अक्षय कुमार यांच्याहस्ते पुणे अथवा सातारा येथे करण्यात येणार आहे. त्याला पथकाचे बॅँ्रड अम्बॅसिडर होण्याची विनंती करणार असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.