बंद पडलेल्या कूपनलिकेचे पाणी झेपावले आकाशात; निसर्गाच्या चमत्काराची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 08:36 PM2019-09-25T20:36:45+5:302019-09-25T20:37:18+5:30
गेल्या दोन - अडीच वर्षापूर्वी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात आलेली कूपनलिका ग्रामपंचायतीने पाण्याअभावी सोडून दिली होती. परंतु, याच कूपनलिकेतून अचानक सुमारे १५० ते २०० फूट पाणी आकाशात झेपावले.
विटा: गेल्या दोन - अडीच वर्षापूर्वी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात आलेली कूपनलिका ग्रामपंचायतीने पाण्याअभावी सोडून दिली होती. परंतु, याच कूपनलिकेतून अचानक सुमारे १५० ते २०० फूट पाणी आकाशात झेपावले. या प्रकारामुळे ग्रामस्थही अचंबित झाले आहेत. तसेच हा सर्व प्रकार निसर्गाचा चमत्कार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सदर घटना वासुंबे (ता. खानापूर, जि. सांगली) येथे मंगळवारी घडली असून दूसऱ्या दिवशी (बुधवारी) स्थानिक ग्रामस्थांना हा प्रकार दिसून आला.
पाण्याअभावी बंद पडलेल्या कूपनलिकेतून पाण्याचे कारंजे आकाशाकडे झेपावत असल्याचे समजताच हा चमत्कार पाहण्यासाठी वासुंबे गावात लोकांची गर्दी झाली होती. खानापूर तालुक्यातील वासुंबे हे दुष्काळग्रस्त गाव आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे २०१७ ला ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी शासकीय विहिरीशेजारी असलेल्या यल्लमा मंदिराजवळ कूपनलिका खुदाई केली होती. परंतु, ही कूपनलिका खुदाई करीत असताना आडवा पडदा लागल्याने हवा दुसरीकडे जाऊ लागली. त्यामुळे कूपनलिका खुदाई करणाºयाने ३०० ते ३२० फुटापर्यंतच खुदाई केली. पण त्या कूपनलिकेला पाणी लागले नाही.
तसेच कूपनलिका गेल्या दोन ते अडीच वर्षापासून बंद अवस्थेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वासुंबे व परिसरात पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी ओढ्यातून कूपनलिकेत जात होते. मंगळवारी सकाळी अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर कूपनलिकेतून सुमारे दीडशे ते दोनशे फूट पाण्याचा कारंजा आकाशात झेपावताना लोकांच्या निदर्शनास आला. हे वृत्त वाºयासारखे गावात व परिसरात पसरताच ते पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. बंद कूपनलिकेतून मोठ्या प्रमाणात पाणी आकाशात झेपावल्याने हा निसर्गाचा अद्भूत चमत्कार असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू झाली.
नेमके कारण अस्पष्ट...
वासुंबे येथे पाणी लागले नसल्याने सोडून दिलेल्या कूपनलिकेतून अडीच वर्षानंतर पाण्याचे मोठे कारंजे उडू लागले. हा प्रकार दिवसातून दोनवेळा होत असून त्यातील पाणी कारंजासारखे दीडशे फूट आकाशात झेपावत असल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.