वाळवा पश्चिम भागात जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:28 PM2019-05-05T23:28:22+5:302019-05-05T23:28:27+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्याच्या दोन्ही बाजूला कृष्णा आणि वारणा अशा दोन बारमाही नद्या वाहत असल्या तरी, तालुक्याच्या पश्चिम भागातील ...
इस्लामपूर : वाळवा तालुक्याच्या दोन्ही बाजूला कृष्णा आणि वारणा अशा दोन बारमाही नद्या वाहत असल्या तरी, तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचे संकट ओढवतच असते. स्थानिक विहिरी आणि कूपनलिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची गरज भागली तरी, शेतीच्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
वाळवा तालुक्यामध्ये एकूण ९४ गावे आहेत. कृष्णा-वारणा नदीकाठचा पट्टा वगळता पश्चिम भागातील २५ ते ३0 गावांना नेहमीच पाणी टंचाईचा त्रास सोसावा लागतो. तालुक्यामध्ये एकूण २६ पाझर तलाव आहेत. त्यातील १९ पाझर तलाव पश्चिम भागात आहेत. उरलेले ७ पाझर तलाव ताकारी, पोखर्णी गावात २, गोटखिंडी गावात ३ व दुधारी गावात १ असे आहेत. पश्चिम भागात ४00 ते ५00 कूपनलिका आणि तेवढ्याच विहिरी आहेत. उन्हाळ्यामुळे भूजल पातळीत घट झाल्याने कूपनलिकेच्या पाण्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. तालुक्यातील या २६ पाझर तलावांची पाणी साठवण क्षमता ही ३ हजार ५९१ सहस्र घनमीटर इतकी आहे. यातून ६८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता आहे. मात्र केवळ ३७६ हेक्टर क्षेत्र लागवडीच्या पाण्याखाली येते. मात्र या उन्हाळ्यात रेठरेधरण, कार्वे, येलूर या मोठ्या पाझर तलावातील पाणीसाठा वगळता, इतर सर्व तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत.
पश्चिम भागातील महादेववाडी, माणिकवाडी, नायकलवाडी या गावांमधून पाणी टंचाईच्या झळा जाणवतात. मात्र लघु पाटबंधारे विभागामार्फत वाटेगाव येथील संस्थेचे पाणी अधिग्रहण करुन ते पुरवले जात आहे. जांभुळवाडी गावातील बांदल वस्ती आणि धनगर वस्तीलाही गावातीलच विहिरीचे पाणी उपलब्ध करुन दिले आहे. आतापर्यंत पश्चिम भागातील कोणत्याही गावामधून टँकरची मागणी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तालुक्याच्या पश्चिम भागातील या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मरळनाथपूर, गाताडवाडी, ठाणापुडे, येलूर, गोटखिंडी, सुरुल, ओझर्डे, नागाव, पोखर्णी, शिवपुरी, लाडेगाव, जक्राईवाडी, वशीसह महामार्गालगत असलेल्या गावांतून पेयजल योजनांची कामे सुरु आहेत. यातील काही योजना अंतिम टप्प्यात आल्या आहेत.