सांगली जिल्ह्यात २४८ गावांतील पाणी दूषित, नेमकी गावं कोणती...जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 06:39 PM2023-01-21T18:39:14+5:302023-01-21T19:03:12+5:30
सांगली : जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी शाळेसह गावांतील पाण्याचे पाच हजार २७६ नमुने घेतले होते. ...
सांगली : जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी शाळेसह गावांतील पाण्याचे पाच हजार २७६ नमुने घेतले होते. यापैकी २४८ गावांतील ३२७ पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. या गावातील शाळा, अंगणवाड्यांसह ग्रामपंचायतीला दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.
आटपाडी तालुक्यातील करगणी, दिघंची, गोमेवाडी, शेटफळे, करगणीसह १३ गावांमधील १४ पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. जत तालुक्यातील संख, येळवी, माडग्याळ, उमदी, निगडी खुर्दसह १८ गावांमधील २० पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एस, बस्साप्पावाडी, कोकळे, कुकटोळी, मोरगाव या पाच गावांतील पाच नमुने दूषित, तर मिरज तालुक्यातील मालगाव, एरंडोली, खंडेराजुरी, सलगरे, कसबेडिग्रज, विजयनगर, कवठेपिरान, कवलापूर, भोसे, बुधगाव आदी ३९ गावांतील ६८ नमुने दूषित आले आहेत.
तासगाव तालुक्यातील मांजर्डे, आरवडे, बस्तवडे, सावळज, वायफळे, जरंडी आदी १६ गावांतील पाण्याचे २४ नमुने दूषित आल्याने संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविकांना पाणी शुद्धीकरणाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाळवा, शिराळा, खानापूर, कडेगाव तालुक्यातीही पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. या गावामधील शाळा, अंगणवाडीसह ग्रामपंचायतींना दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान
स्वच्छ पाण्याबाबत नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. दि. १ डिसेंबर २०२२ ते दि. २५ जानेवारी २०२३ या कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे आणि अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळा, कॉलेज, हायस्कूल व सर्व शासकीय कार्यालयांतील पिण्यासाठी वापरात असणाऱ्या पाण्याचे पाणी नमुने तपासण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.