वॉटर कप स्पर्धेसाठी पवारवाडी एकवटली !

By admin | Published: April 12, 2017 10:57 PM2017-04-12T22:57:02+5:302017-04-12T22:57:02+5:30

३५० जणांचे श्रमदान : ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहीम; यशस्वी करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

Water Cup competition for Pawarwadi! | वॉटर कप स्पर्धेसाठी पवारवाडी एकवटली !

वॉटर कप स्पर्धेसाठी पवारवाडी एकवटली !

Next



औंध : खटाव तालुका व कोरेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या, औंधपासून सहा किलोमीटर अंतरावरील व कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी या गावाने पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ उठवून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम एकजुटीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सुमारे ३५० नागरिक, महिला, युवक, युवतींनी कामाला प्रारंभ केला असून, यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत बाजी मारण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
पवारवाडी हे गाव औंधच्या पश्चिमेला घाटाखाली सहा किलोमीटर अंतरावर आहे. घाटाखालील बऱ्याचशा गावांमधून कॅनॉल, पोटकॅनॉल गेले आहेत; पण पवारवाडी हे गाव हुकमी शेती पाण्यापासून वंचित आहे. गावामध्ये १९० कुटुंबे व ९०३ एवढी लोकसंख्या आहे. शेतीला शाश्वत पाणी नसल्याने गावातील बरेचसे नागरिक, युवक नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरच आहेत.
गावालगत पेरणी योग्य २३८ हेक्टर जमीन आहे. तर ९४ हेक्टरवर फॉरेस्ट, २२ हेक्टरवर सरकारी जमीन आहे. मात्र, पाणीच उपलब्ध होत नसल्याने रब्बी, उन्हाळी हंगामात या जमिनीतून पीक उत्पन्न निघत नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाईही काहीवेळा जाणवते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी गावाच्या सभोवती असणाऱ्या उजाड डोंगर रांगांचा, चढ-उतारांचा उपयोग पाणी अडविण्यासाठी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
कृषी विभाग, वसंतदादा पाटील शिक्षण संस्था रहिमतपूर, पाणी फाउंडेशन, गावातील माजी विद्यार्थी संघटना, परांजपे अ‍ॅटोकास्ट आदींच्या सहकार्यातून हे काम तडीस नेण्यात येणार आहे. ४२ दिवसांत हे सर्व काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती सरपंच राजेंद्र पवार यांनी दिली.
या माध्यमातून नालाबंडिंग, सलग समतल चर, डीपसीसीटी, बंधारे, माती बांध, तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, विहिरींचे पुनर्भरण, अनगड दगडी बांध घालणे व अन्य कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार आहेत. तसेच ठिबक सिंचन, मायक्रो स्प्रिंकलर योजनेद्वारेच शेतीच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून कामाने गती घेतली असून, सकाळी ७ ते ११ असे नियमित चार तास काम केले जाणार आहे.
हे काम सुरू झाल्याने गावात उत्साह, आनंदाचे वातावरण असून, कोणत्याही परिस्थितीत गाव पाणीटंचाई मुक्त करायचेच असा दृढ निश्चय प्रत्येक ग्रामस्थ, महिला, युवक, युवतींच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरपंच राजेंद्र पवार, उपसरपंच सिंधुताई पवार, विलास पवार, पांडुरंग पवार, समन्वयक मोहन लाड, कृषी
सहायक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Water Cup competition for Pawarwadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.