विट्यात दररोज २० लाखांच्या कापड उत्पादनावर पाणी--वीज भारनियमनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 08:14 PM2017-10-07T20:14:10+5:302017-10-07T20:16:39+5:30
दिलीप मोहिते/विटा : महावितरणने विटा शहरात दररोज सरासरी साडेतीन तास वीज
भारनियमन निश्चित केले असून, या भारनियमनाचा सर्वाधिक फटका
वस्त्रोद्योगाला बसणार आहे. या साडेतीन तासांच्या भारनियमनात शहरातील
६००० यंत्रमागांचे प्रतिदिन ७५ हजार कापड उत्पादन थांबणार असून, सुमारे
२० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे.
दरम्यान, याचा फटका यंत्रमागावर काम करणाºया कामगारांनाही सोसावा लागणार
असून, शहरातील दोन हजार कामगारांची प्रतिदिन ७५ हजार रुपये मजुरी बुडणार
आहे. त्यामुळे या वीज भारनियमनामुळे यंत्रमागधारक संतप्त झाले आहेत.
विटा शहरात वस्त्रोद्योग यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे
महावितरणने चार फिडर तयार केले आहेत. त्यातील दोन फिडर ए ग्रुपला, तर
दुसरे दोन फिडर बी ग्रुपला जोडले आहेत. त्यातील ए ग्रुपला सव्वातीन तास
आणि बी ग्रुपला ४ तास वीज भारनियमन निश्चित केल्याने सरासरी भारनियमन
साडेतीन तासाचे समजण्यात येत आहे.
विट्यात सहा हजार यंत्रमागधारक सव्वातीन तासात सरासरी १२ मीटर कापड तयार
करतात. त्यामुळे सव्वातीन तासाच्या कालावधित सुमारे ७५ हजार मीटर
कापडाच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे. दरम्यान, या यंत्रमागावर काम
करणाºया कामगारांची संख्या दोन हजाराच्या आपपास आहे. त्यामुळे
कामगारांनाही भारनियमनाचा फटका बसला असून, दररोज ७५ हजार रुपयांच्या
मजुरीला मुकावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या या भारनियमनामुळे
सर्वसामान्य व वस्त्रोद्योग व्यावसायिकांत संतापाची लाट उसळली आहे.
प्रश्नाला वाचा फोडणार : किरण तारळेकर
महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे भारनियमन करावे लागत आहे. कोळसा
संपल्याचे सांगून महावितरण स्वत:चे हसू करून घेऊ लागले आहे. शेतकरी,
उद्योजक व सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली जाईल.
भविष्यात सर्वच ग्राहकांना पुरेशा दाबाने वीज मिळाली पाहिजे, असे मत विटा
यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केले.