घरात पाणी शिरलंय, संसार बुडालाय, तरीही सांगली पोलीस 'ऑन ड्युटी 24 तास'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 12:36 PM2019-08-11T12:36:09+5:302019-08-11T12:36:14+5:30
सांगलीच्या सिसला रस्त्यावरील पोलीस लाईन कृष्णा माईने गिळून टाकली.
सांगली - कोल्हापूर आणि सांगलीतील महापूरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सैन्याच्या जवानांसह महाराष्ट्र पोलीसही कर्तव्य बजावत आहेत. ऑन ड्युटी 24 तास असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनाही या पुराचा फटका बसला आहे. खाकी वर्दीतील माणूस आज छाती एवढ्या पाण्यात फिरतोय, लोकांचा जीव वाचवतोय. पण, त्याचाही संसार पाण्यात बुडला आहे. घराघरात कृष्णमाई ( कृष्णा नदी) नांदताना दिसून येत आहे. पण, लोकसेवा हे व्रत घेऊन पोलीसमामा पूरग्रस्तांसाठी राबतोय. सांगलीतल्या पोलीस कॉलनीत आणि पोलीस स्टेशनमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. .या पुराच्या पाण्यामुळे पोलिसांचाही संसार उध्वस्त झाला आहे.
सांगलीच्या सिसला रस्त्यावरील पोलीस लाईन कृष्णा माईने गिळून टाकली. सुमारे 50 पेक्षा जास्त पोलीस लाईनमधील घरे बुडाली आहेत. पाण्यात बुडलेल्या घराची केवळ कौलं दिसत आहेत. हीच स्थिती सांगलीच्या बदाम चौकातील पोलीस लाईनमध्ये आहे. फरक फक्त एवढाच आहे कौलं थोडं जास्त दिसत आहेत. संसार, मात्र पूर्ण बुडून गेला आहे. जेवढं शक्य होतं तेवढं घरगुती सामान शिफ्ट करण्यात आलंय. बायका मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचण्यासदेखील या पोलिसांना वेळ मिळाला नाही.
सांगली पाण्यात बुडत होती. ते पाहायला लोक येत होते. त्यांना आवरायला सावरायला आणि धीर द्यायला या खाकी वर्दीतील माणूसच सर्वप्रथम पुढे सरसावले होते. आधीच गळकी घरे, मोडक्या खिडक्या, मोडके दरवाजे, उचकटलेल्या फरशा, घाणीचे साम्राज्य यांनी पोलिसांचा संसार आव्हानात्मक होताच. पण, त्यात हे नवे संकट उभे राहिले. मात्र, तरिही सांगलीतील पूरस्थितीमध्ये वर्दीतील माणसे ही दिवस रात्र रस्त्यावर आणि पाण्यात उभे राहून आपलं कर्तव्य बजावत आहेत. म्हणून महाराष्ट्र पोलीस म्हणजे ऑन ड्युटी 24 तास म्हणताना सॅल्यूट करावा वाटतो.